Tue, Jun 25, 2019 14:05होमपेज › Pune › क्रीडा समिती उपसभापतींचे रंगले राजीनामानाट्य

क्रीडा समिती उपसभापतींचे रंगले राजीनामानाट्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 
 

महापालिकेच्या क्रीडा समितीने मंजूर केलेले विषय स्थायी समितीच्या सभेत बदलले जात आहेत, त्यामुळे क्रीडा समितीला अधिकारच राहिले नसल्याचा आरोप करत, क्रीडा समिती उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ यांनी आज समितीच्या उपसभापतिपदाचा राजीनामा पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे दिला. पक्षनेत्यांच्या समजवणीनंतर त्यांनी ‘यू टर्न’ घेतला; मात्र त्यांच्या या राजीनामानाट्यामुळे पालिकेतील सत्तारूढ भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 

निगडी प्राधिकरण येथील महापालिकेची बाहुबली व्यायामशाळा नवनाथ मित्रमंडळ प्राधिकरण या मंडळास 11 महिने कराराने सेवाशुल्क तत्त्वावर  चालविण्यास देण्याचा विषय याआधी उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्रीडा समिती सभेत मंजूर करण्यात आला; मात्र स्थायी समितीच्या सभेत तो तहकूब करण्यात आला, त्यामुळे आज ओव्हाळ यांनी थेट उपसभापतिपदाचा राजीनामा पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे दिला. 

पत्रकारांनी याबाबत भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला; मात्र नंतर पालिकेत पुन्हा उपस्थित होताच त्यांनी ‘यू टर्न’ घेतला. क्रीडाचे विषय स्थायीच्या सभेत बदलले जात आहेत. हे करताना क्रीडा समितीला विचारले जात नाही, त्यामुळे क्रीडा समिती नावापुरतीच राहिली आहे, असे सांगत मी पक्षनेत्यांकडे राजीनामा देण्याचा विचार बोलून दाखवला; मात्र त्यांनी यातून मार्ग काढू, असे सांगितल्याने राजीनाम्याचा विचार बाजूला ठेवला, असे ओव्हाळ म्हणाले. पक्षनेते एकनाथ पवार यांना ओव्हाळ यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, माझ्याकडे राजीनामा आला नाही. तुमच्याकडे बातमी आहे त्याअर्थी काही झाले असावे; मात्र ओव्हाळ यांचे समाधान होईल याची काळजी घेतली जाईल. 

याबाबत स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, स्थायी समितीच्या सभेत सदर विषय आला तेव्हा स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे यांनी त्यास विरोध केला. उपमहापौर शैलजा मोरे यांनीही अशीच भूमिका घेतली. त्यामुळे  प्रोटोकॉल पाळणे गरजेचे होते. शिवाय एक विषय एकदा मंजूर केला असेल आणि तो दुसर्‍यांदा आणायचा असेल, तर 6 महिने तो आणता येत नाही. भाजपच्या नगरसेवकांनी सभाशास्त्र शिकून घ्यावे, असा सल्ला देत सावळे यांनी  स्वपक्षीय नगरसेवकांना घरचा आहेर दिला.