Thu, Jul 18, 2019 20:56होमपेज › Pune › शासनाचा सोशल मीडिया महामित्र उपक्रम

शासनाचा सोशल मीडिया महामित्र उपक्रम

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 04 2018 12:23AMपिंपरी : पूनम पाटील 

सध्या सोशल मीडियाचा जमाना असून, देशातील सर्वाधिक तरुण वर्ग; तसेच सर्वच वयोगटातील नागरिक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. यासाठी या वेगवान माध्यमाचा उपयोग करून घेण्यासाठी; तसेच मागील काही घटना बघता या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर व्हावा यासाठी राज्य शासनाने सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत एक ते अठरा फेब्रुवारीदरम्यान नोंदणी सुरू झाली असून, शहरातील तरुणाईकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

 बहुतांश सर्वच जण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसह सोशल मीडियावर विविध कारणांनी सक्रिय आहेत. सोशल मीडियामुळे समाजमन बदलण्यासाठी प्रभावी वापर होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरुणांची मने व मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग करण्यासाठी सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे सोशल मीडिया क्षेत्रातील नामवंत; तसेच प्रभावी व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याची व संवाद साधण्याची मिळणार आहे. त्याचबरोबर यातील सोशल मीडिया महामित्र पुरस्कारप्राप्त व्यक्तींना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे युवकांमध्ये या उपक्रमात सहभागी होण्याबाबत उत्सुकता वाढली आहे. 

उपक्रमात सहभागी होण्यासाठी... 

या उपक्रमामध्ये सहभागी  होण्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल प्ले स्टोअरवरून महामित्र हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये नाव, वय व पत्ता आदी तत्सम तपशील द्यावा लागणार असून, यासाठीची नोंदणी प्रक्रिया दिनांक 1 फेब्रुवारी  ते  18 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षांवरील रहिवासी या उपक्रमात सहभागी होऊ शकणार असून, निःशुल्क नोंदणी करता येणार आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातून दहा सोशल मीडिया महामित्रांची निवड करण्यात येणार आहे.  सोशल मीडिया-महामित्र उपक्रमात तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.