Wed, Feb 20, 2019 08:39होमपेज › Pune › कोवळ्या वयातच वाढतेय हिंसक वृत्ती

कोवळ्या वयातच वाढतेय हिंसक वृत्ती

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:09AM

बुकमार्क करा
पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी नुकताच पुकारलेला  महाराष्ट्र बंद कडकडीत ठरला. मात्र अतिशय कोवळ्या वयातील मुलांच्या हाती दगड, हिंसक वृत्तीची पेरली गेलेली बीजे पाहून अनेकांच्या चेहर्‍यावर भावी पिढीविषयीची चिंता दिसली. खैरलांजी, खर्डा प्रकरण, रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांची आत्महत्या, तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन आणि  कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थचा महाराष्ट्र बंद यातून दलित समाज संघटित होताना दिसत आहे. उच्चवर्णीय  आणि सत्ताधार्‍यांविरोधातील राग हा समाज उत्स्फूर्तपणे व्यक्त करत आहे. 
तीन जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाचे  नेतृत्व केले.

महाराष्ट्र बंद कडकडीत ठरला. प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केल्यावर त्यांचा आदेश पाळत आंबेडकरी जनतेने बंद मागेही घेतला; मात्र बंद दरम्यान झालेल्या आंदोलनावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आलेल्यामध्ये अतिशय कोवळ्या वयातील मुलांचा समावेश होता. त्यांच्या हातात दगड होते. पिंपरी चिंचवडमध्ये बंदला जे हिंसक वळण लागले, त्यात लहान मुलांचा मोठा सहभाग होता. विशेषतः डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस बंदोबस्तात अडकल्याचे पाहून या मुलांनी महापालीकेसमोरील कमला क्रॉस रोडवरील वाहनांची  तोडफोड केली. 

कोरेगाव भीमा घटनेनंतर सोशल मीडियावर अफवांचे पीक आले होते. त्यात हातात दगड घेऊन मारायला निघालेल्या चिमुरड्याच्या व्हिडिओमुळे कोवळ्या मुलांच्या मनात जातीपातीचे विष कसे कालविले जात आहे ते लोकांसमोर आले.तो व्हिडीओ खरा की खोटा? तो खरा असेल तर तो बनवला कोणी? त्याचा शोध पोलिस घेणार की नाही? लहान मुले अनुकरणप्रिय असतात हे लक्षात घेऊन त्यांचे, पर्यायाने देशाचे भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत की नाही? मुलांची डोकी भडकावून त्यांना हिंसक बनविण्याऐवजी विकासाकडे त्यांना घेऊन जाण्याचे प्रयत्न होणार आहेत की नाही हाच 
खरा प्रश्‍न आहे.