होमपेज › Pune › स्वयंरोजगार संस्थांची पुनर्विचार 

स्वयंरोजगार संस्थांची पुनर्विचार 

Published On: Dec 23 2017 2:31AM | Last Updated: Dec 23 2017 1:56AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा, रस्ते व गटर्स सफाईचे दैनंदिन काम वेगवेगळ्या 68 स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून करून घेण्यात येत आहे; मात्र त्यांना डावलून केवळ दोनच मोठ्या कंपन्यांना या कामाचा ठेका देण्याची कार्यवाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. हा प्रकार स्वयंरोजगार संस्थाच मोडीत काढण्याचा प्रकार असून, त्या निर्णयास स्थगिती देण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.20) दाखल करून घेतली. 
राज्य शासनाच्या कायद्यानुसार स्वयंरोजगार संस्थांना सफाईचे काम देणे बंधनकारक आहे; मात्र महापालिकेने राज्य शासनाचे नियम डावलत निविदेमध्ये बेकायदेशीररीत्या शर्ती व अटी लादल्या आहेत.

त्यामध्ये वर्षाला 30 कोटी रुपयांच्या उलाढालीच्या नव्या अटीचा समावेश केला आहे. त्यामुळे कमी उलाढालीच्या सर्वच स्वयंरोजगार संस्थांना निविदा प्रक्रियेतून बाहेर काढले गेले आहे.  या संदर्भात फेडरेशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र महापालिकेने न्यायालयाची दिशाभूल करीत स्वयंरोजगार संस्थांनाही निविदा प्रक्रियेत सामावून घेत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला, असा आरोप फेडरेशनने केला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली. तेथेही महापालिकेची बाजू ग्राह्य धरण्यात आली. यामुळे फेडरेशनचे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका 15 डिसेंबरला दाखल केली आहे. ती न्यायालयाने बुधवारी (दि.20) दाखल करून घेतली. 

या संदर्भात फेडरेशनचे वकील राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले की, राज्य शासनाचे नियम मोडीत काढत महापालिकेचे आयुक्त नवी पद्धत लागू करीत आहेत. त्याचे परिणाम संपूर्ण राज्यात होणार असून, स्वयंरोजगार सहकारी संस्थाच मोडीत निघणार आहेत. न्यायालयीन कामकाज लक्षात घेता, निविदा प्रक्रियेसंदर्भात येत्या महिनाभरात कोणताही निर्णय महापालिकेस घेता येणार नाही. या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता, अद्याप याबाबत महापालिकेस काही प्राप्त झालेले नाही. आल्यानंतर पाहू, असे ते म्हणाले.