Fri, Jul 19, 2019 01:21होमपेज › Pune › सावित्रीबाई फुले ग्रंथालय की कार्यालय?

सावित्रीबाई फुले ग्रंथालय की कार्यालय?

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 1:05AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गांधीनगर, पिंपरी येथील सावित्रीबाई फुले मध्यवर्ती ग्रंथालयाची इमारत बांधून तयार आहे. त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील काही कार्यालयांच्या स्थलांतरासोबत वाचनालयाच्या पर्यायाचा शोध घेण्यासाठी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि अधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 11) पाहणी केली. त्यामुळे त्या ठिकाणी ग्रंथालय होणार की कार्यालय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. संबंधित संघटनांची चर्चा करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.  मागील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात 2009 मध्ये गांधीनगर, पिंपरी येथील महात्मा फुले पूर्णाकृती पुतळ्याजवळील मोकळ्या जागेत इमारत बांधून तेथे सावित्रीबाई फुले मध्यवर्ती ग्रंथालय बांधण्याचा निर्णय झाला होता.

त्या ठिकाणी मध्यवर्ती ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, संदर्भग्रंथ, सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, सांस्कृतिक सभागृह आदींचे नियोजन करण्यात आले होते. त्या दृष्टीने सदर इमारतीची रचना केली गेली आहे; मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात विविध विभागांना जागा अपुरी पडत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे येथील शिक्षण समिती, आकाशचिन्ह परवाना, एलबीटी, कायदा विभाग; तसेच नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील क्रीडा विभागाचे कार्यालय सदर सावित्रीबाई फुले ग्रंथालय इमारतीमध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत. त्यास सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सहमती दिली आहे

; मात्र ही बाब वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील विविध सामाजिक संस्था; तसेच ज्येष्ठ नागरिक संघाने 25 ऑक्टोबर 2017 ला महापालिकेस पत्र देऊन सदर इमारत वेगवेगळ्या हेतूने वापरास देण्याची मागणी केली होती; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने इमारतीचा हेतू बदलण्याबाबत तीव्र आक्षेप घेत हरकत घेतली आहे. प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी महापौर काळजे व सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी सदर इमारतीची सोमवारी सायंकाळी पाहणी केली. त्यांच्यासमेवत अधिकारीही उपस्थित होते. सदर जागेत वाचनालयासह विविध विभागांची कार्यालये सुरू करण्याबाबत महापालिकेचे सकारात्मक प्रयत्न आहेत. सदर इमारत मोठी असून, त्या ठिकाणी वाचनालयासह महापालिकेची इतर कार्यालये सुरू करता येतील. त्या दृष्टीने पाहणी करण्यात आली आहे. या विषयावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबतही चर्चा झाली आहे. इमारतीची पाहणी करून तसे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले जाणार आहेत. तत्पूर्वी संबंधित संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाणार आहे. सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे महापौर काळजे व सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी सांगितले.