Wed, Jan 16, 2019 13:59होमपेज › Pune › गरज पडल्यास चौकशी

गरज पडल्यास चौकशी

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:30AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

रस्त्यांच्या 425 कोटींच्या कामांचे दर 15 ते 20 टक्के जास्त दिसत असले, तरी ते स्वीकृत दरापेक्षा केवळ 10 टक्के जास्त आहेत. शिवसेनेच्या मागणीनुसार गरज पडल्यास त्या दरांची पुन्हा पडताळणी केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी (दि.13) दै. ‘पुढारी’स सांगितले.  रस्त्यांच्या कामांत रिंग होऊन 90 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, त्यात आयुक्त, भाजपाचे पदाधिकारी व ठेकेदार सामील असल्याचा आरोप शिवसेनेने पत्रकार परिषदेत केला. त्या संदर्भात विचारले असता ते बोलत होते. 

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, सदर कामांसाठी प्राप्त झालेले कामांचे दर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासून घेतले आहेत. कामाचे अधिकारी व पदाधिकार्‍यांसमोर सादरीकरणही झाले आहे. सर्वपक्षीय सदस्य असलेल्या स्थायी समिती सभेत सादरीकरण करून सर्व निविदा प्रक्रिया समजावून सांगण्यात आली आहे. ही ई-निविदा प्रक्रिया होती. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पारदर्शक आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र, शिवसेनेच्या मागणीनुसार गरज पडल्यास निविदा प्रक्रियेची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आयुक्तांनी एकाच दिवशी या कामांच्या सर्वच फायलींवर सह्या केल्याचा आरोप केला आहे.  त्यासंदर्भात आयुक्त म्हणाले की, ज्या दिवशी एखाद्या कामास स्थायी समितीकडून मंजुरी मिळते त्या दिवशी माझ्याकडे फाईल येते आणि मी सह्या करतो. कधी 20, तर कधी 40 फायली माझ्याकडे येतात. त्यामुळे एकाच दिवशी सर्व फायलींवर सह्या केलेल्या नाहीत, असे हर्डीकर यांनी स्पष्ट केले.