Sun, Feb 17, 2019 19:13होमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेशासाठी होणार आजपासून शाळांची नोंदणी 

‘आरटीई’ प्रवेशासाठी होणार आजपासून शाळांची नोंदणी 

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:14AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या 25 टक्के आरक्षण जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 24 जानेवारीपासून होत आहे. यासाठी इतर ठिकाणी 3 जानेवारीपासून शाळा नोंदणीस सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेसंदर्भात (दि.8) रोजी बैठक घेण्यात आली. त्यानुसार आज (मंगळवारी) शाळा नोंदणीस सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांनी दिली. 

‘आरटीई’ प्रवेशासाठी 3 ते 20 जानेवारीपर्यंत शाळांची नोंदणी करण्यात येणार आहे. 22 व 23 जानेवारी रोजी नोंदणी केलेल्या शाळांचे व्हेरिफिकेशन होऊन दि. 24 पासून पालकांना अर्ज भरण्यास संधी दिली जाणार आहे. 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत पालक आपल्या पाल्यांचे ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत. पहिली लॉटरी 12 व 13 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. ‘आरटीई’ प्रवेश अकरावीप्रमाणे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र आता पुन्हा तो बदलण्यात आला असून, एका विद्यार्थ्याला एकच संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक व तीन किमीच्या आत शाळा असल्याचे बंधन असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाची केवळ एकच संधी दिली जाणार आहे; तसेच परिसरातील केवळ दहा शाळांचा पसंतिक्रम पालक देऊ शकणार आहेत.