Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Pune › पुणे-लोणावळा लोकलच्या समस्या तातडीने दूर करा

पुणे-लोणावळा लोकलच्या समस्या तातडीने दूर करा

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:58AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या समस्या दूर करण्याची मागणी खा. श्रीरंग बारणे यांनी पुणे विभागाच्या  रेल्वे क्षेत्रीय अधिकार्‍यांबरोबर  बैठक घेऊन केली. पुणे-लोणावळा लोकल रेल्वेची संख्या कमी करून काही लोकल रद्द केल्या आहेत. या अचानक झालेल्या बदलाचा फटका नोकरदार, कामगार, विद्यार्थी व प्रवाशांना बसला. पुणे-लोणावळा ही लोकलसेवा गेल्या 70 वर्षांपासून चालू असून, लोकलमधून दररोज सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करतात.  यातून रेल्वे विभागास दरमहा सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये उत्पन्न मिळते. असे असताना रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता लोकल रद्द करण्यात आल्या, तर काही लोकलच्या वेळेत बदल करून उशिरा सोडल्या गेल्या.

त्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात खा.  बारणे यांनी आज पुणे रेल्वे विभागाचे मुख्य क्षेत्रीय अधिकारी मिलिंद देऊसकर यांच्याशी   चर्चा केली. गेल्या दोन-चार दिवसांपासून पुणे-लोणावळा रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात व पुणे लोणावळा ही लोकल रेल्वेसेवा पूर्वपदावर आणावी, अशी मागणी खा. बारणे यांनी केली. 
या वेळी पुणे विभागाचे क्षेत्रीय अधिकारी मिलिंद देऊसकर म्हणाले की, गेल्या दोन-चार दिवसांपासून धुक्यामुळे दूरवरून येणार्‍या गाड्या उशिरा येत होत्या, त्यामुळे लोकलचे वेळापत्रक बदलले गेले, त्याचा त्रास प्रवाशांना झाला. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाच्या वतीने  दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवाशांची संख्या कमी असल्याने 11.20 ची लोकल बंद केली आहे; परंतु थोड्याच वेळाने 12.05 ची लोकल असल्याने व शटलही असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही. सकाळच्या वेळेत कामगारांना सोयीस्कर असलेल्या दोन्ही लोकल सेवा वेळेस सोडल्या जातील, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितल्याची माहिती खा. बारणे यांनी दिली.