Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Pune › मेट्रोला नऊ जागा 30 वर्षे भाडेकराराने

मेट्रोला नऊ जागा 30 वर्षे भाडेकराराने

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:53AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 9 जागांची मागणी महाराष्ट्र रेल कार्पोरेशन लिमिटेडने महापालिकेकडे केली आहे. एकूण 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर या मोक्याच्या जागा देण्याबाबतचा निर्णय महापालिकेच्या 20 जानेवारीला होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.  पुणे मेट्रोचे काम शहरात वेगात सुरू आहे. मोरवाडी चौक ते दापोडीतील हॅरिस पुलापर्यंत मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम ग्रेडसेपरेटर मार्गावर सुरू आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो वाहनतळ, मल्टीलेव्हल पार्किंग विकसित करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र रेल कार्पोरेशनने े पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील जागांची मागणी महापालिकेकडे केली आहे. या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर व महाराष्ट्र रेल कार्पोरेशनच्या अधिकार्‍यांची 9 जानेवारीला बैठक झाली. त्या बैठकीत सदर 9 जागा भाडेतत्त्वावर देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. 

सदर 9 जागांचा आकार एकूण 2 लाख 18 हजार 176.89 चौरस फूट (20 हजार 269.30 चौरस मीटर) आहे. या जागा 30 वर्षे भाडेकरारावर महारेल कार्पोरेशनला देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जागेसाठी वेगवेगळा भाडेदर आहे. त्यानुसार 30 वर्षांसाठी एकूण 28 कोटी 16 लाख 98 हजार 312 रुपये भाडे महापालिकेस मिळणार आहेत. या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय 20 जानेवारीला होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. सभेने हिरवा कंदील दिल्यानंतर पुणे मेट्रोला सदर जागा हस्तांतरण केल्या जाणार आहेत. जागेचे भाडे प्रकल्पातील पालिका हिश्श्यातून वळते होणार

पुणे मेट्रोच्या दापोडी ते पिंपरी या 7.15 किलोमीटर अंतराच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 287 कोटी 70 लाख रुपये आर्थिक हिस्सा आहे. त्यांपैकी  जागांबाबतचा हिस्सा रक्कम 182 कोटी 60 लाख रुपये इतका असणार आहे. सदर बाबींचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता महाराष्ट्र रेल कार्पोरेशन लिमिटेडला महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 79 (ग)अन्वये महापालिकेच्या 9 जागा 30 वर्षे कालावधीसाठी आर्थिक हिश्श्यापोटी देण्यात येणार आहे.