होमपेज › Pune › राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत  

राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत  

Published On: Jan 01 2018 2:03AM | Last Updated: Dec 31 2017 11:07PM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आपली सत्ता असताना राष्ट्रवादीने समाविष्ट गावांच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आता भाजपने या गावांमध्ये विकासाची गंगा पोचविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना पोटशूळ उठला आहे. समाविष्ट गावांतील विकासासाठी 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना गडबड झाली असेल, तर वाघेरे यांनी त्याचे पुरावे द्यावेत. भाजप दोषींना अजिबात पाठीशी घालणार नाही. आपली दुकानदारी कायमची बंद झाली म्हणून बोंबाबोंब करू नये, अशा शब्दांत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाघेरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना पवनाथडी जत्रेवर माझे ऐकून खर्च केला जात होता, असे विधान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले आहे. प्रत्यक्षात सांगवीत मोठी जागा उपलब्ध असल्याने पवनाथडीचे या ठिकाणी आयोजन करावे, यासाठी मी आग्रही होतो.  

पवनाथडी जत्रेवर अनावश्यक खर्च करण्याचे टाळून भाजपने करदात्यांचे पैसे वाचविले, त्याचा आनंद होण्याऐवजी वाघेरे यांचे वेगळेच दुखणे बाहेर आले आहे. त्यांनी शहरातील जनतेवर प्रेम केले असते, तर कदाचित पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असते.  पालिकेतील सत्ताबदलानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वाघेरे यांची दुकानदारी कायमची बंद झाली आहे. त्यामुळेच ते समाविष्ट गावांच्या विकासाकडेही दुकानदारीच्याच नजरेने पाहत आहेत. पालिकेत समावेश झालेल्या गावांना राष्ट्रवादीने गेल्या दहा-बारा वर्षांत विकासापासून जाणूनबूजून वंचित ठेवले. महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प हजारो कोटींच्या घरात असताना राष्ट्रवादीला समाविष्ट गावांमध्ये साधे रस्ते  करता आले नाहीत. या गावांमध्ये इतर सेवा-सुविधांची बोंबाबोंब आहे.

भाजपने समाविष्ट गावांमध्ये विकासाची गंगा पोचविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. पालिकेच्या विकास आराखड्यातील समाविष्ट गावांतील रस्ते आणि आरक्षणांचा विकास करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. आजपर्यंत या गावांकडे केवळ ‘व्होट बँक’ म्हणून पाहणार्‍या राष्ट्रवादीला समाविष्ट गावांमध्ये आगामी काळात होणारी विकासकामे पाहून पोटशूळ उठला आहे.  समाविष्ट गावांतील विकासासाठी 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना त्यात गडबड झाली असल्यास त्याचे पुरावे द्यावेत. भाजप दोषींना अजिबात पाठीशी घालणार नाही, असे आ. जगताप यांनी म्हटले आहे.