Tue, May 21, 2019 12:28होमपेज › Pune › पीएमपी बससेवेचा दर्जा ढासळतोय

पीएमपी बससेवेचा दर्जा ढासळतोय

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:36AM

बुकमार्क करा

पिंपरी : वर्षा कांबळे 

पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएलएमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. तिकीट दर वाढवूनही पीएमपी बससेवेचा दर्जा व गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अनेक प्रयत्न करूनही यामध्ये सुधारणा होण्याऐवजी पीएमपीएमएल बसबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. यामध्ये बंद पडणार्‍या बसेसचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणार्‍या बसची संख्या रोडावली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना कित्येक वेळ बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते.  पिंपरी-चिंचवड शहरात तीन बस डेपो आहेत. यामध्ये निगडी भक्ती-शक्ती डेपो व भोसरी डेपो या डेपोंमध्ये दररोज 30 ते 35 च्या आसपास बंद पडलेल्या बस दुरुस्तीसाठी येतात. या एका बसमध्ये साधारणत: 50 ते 60 लोक असतात. अशा प्रकारे हजारो प्रवाशांना रोज बंद पडणार्‍या बसच्या समस्येला तोंड द्यावे लागते.

आजही अनेक नोकरदार महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा वर्गातील लाखो प्रवासी बसवरच अवलंबून आहेत. बंद पडणार्‍या बसमुळे मार्गावर धावणार्‍या बसेसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पंधरा मिनिटांच्या अंतराने बस धावत असतात तिथे आता अर्धा ते पाऊण तास बस येत नाहीत. बससाठी ताटकळत थांबलेला प्रवासी बसमध्ये चढल्यावर समाधान व्यक्त करतो आणि प्रवासात मध्येच कुठेतरी बस बंद पडते. एक बस बंद पडल्यावर मागून येणार्‍या बसमध्ये दोन बसची गर्दी होते. यामुळे बस प्रवाशांचा वेळ वाया जातो. यामध्ये वाहक व चालक यांच्याबरोबर प्रवाशांची वादावादी सुरू होते.     

प्रत्येक वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कोणत्याही समस्येने ग्रासले की, अत्यंत सोपा आणि कामचलाऊ मार्ग स्वीकारला जातो तो म्हणजे प्रवासी भाड्यात वाढ. अर्थात वारंवार भाडेवाढीचा मार्ग अवलंबूनही परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. पीएमपीएलएम वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी तिकीट दर वाढवून प्रवाशांना नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे बस प्रवाशांची गळती होते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, कर्मचारी-अधिकार्‍यांची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार; तसेच वाहन नादुरुस्ती ही त्यातील काही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक सेवा बेभरवशाची वाटत आहे.

बस वारंवार बंद पडणे, हेल्पलाईन, बस क्रमांक खोडलेला असल्यामुळे तक्रार निवारण न होणे, प्रभावी व्यवस्थेचा अभाव, प्रवासी नियोजन शून्य कारभारामुळे पीएमपीएमएलची प्रवासी सेवा ढासळत चालली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बस वेळेवर येत नाहीत. सायंकाळी घरी जायला खूपच उशीर होतो. कंडक्टरला विचारणा केली असता पन्नासच्या आसपास बस दुरुस्तीसाठी डेपोमध्ये आहेत त्यामुळे मार्गावर बस कमी आहेत, असे सांगत असल्याचे प्रवासी मंजू दरेकर यांनी सांगितले.