Sun, Jul 21, 2019 12:04होमपेज › Pune › कचर्‍यात वाढतोय प्लास्टिकचा टक्का

कचर्‍यात वाढतोय प्लास्टिकचा टक्का

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 1:11AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टिक बंदीचा कायदा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात मात्र प्लॅस्टीकचा वापर वाढतच आहे. गेल्या काही दिवसात कचर्‍यात प्लॅस्टीकचा कचरा सर्वाधिक आढळत असून पर्यावरण तसेच पशुपक्ष्यांसाठी हे प्लॅस्टीक जीवघेणे ठरत आहेत. कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत असून महापालिका मात्र जाणीवपूर्वक या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे. 

शहर आणि उपनगरातील कचराही वेळेवर उचलला जात नाही, त्यामुळे मोकाट गायी व कुत्रे हा कचरा खातात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्लॅस्टिक आणि कॅरीबॅगवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला खरा पण म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांत प्रशासनाच्या वतीने कारवाई थंडावली आहे. त्यामुळे  कॅरीबॅग आणि प्लॅस्टिकचा वापर पुन्हा वाढला असून कचर्‍यात प्लॅस्टीकचे प्रमाण वाढले आहे. शहरातील गुरे प्लॅस्टीक खाल्याने मरत असून रेस्न्यु टिममार्फत अनेक गुरांना वाचवण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र नागरीक रस्त्याच्या कडेलाच प्लॅस्टीकच्या पिशवीतला कचरा टाकतात. तो टाकू नये. त्याऐवजी कापडाच्या पिशव्या वापराव्या असे आवाहन पर्यावरणतज्ञ करत आहेत. 

भारतात जवळपास एक लाख टन घनकचर्‍याची निर्मिती होते.त्यातील जवऴपास पंधरा हजार टन कचरा प्लॅस्टीकचा असतो.त्यापैकी दहा हजार टनाचे रिसायकलींग केले जाते. तर उर्वरीत कचरा आपल्या अवतीभोवती कायम असतो असे एका अहवालाद्वारे समोर आले आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात प्लॅस्टीकचा 148 लाख टन इतका वापर होता. महाराष्ट्रात दरवर्षी 4 लाख 69 हजार टन प्लॅस्टीक कचर्‍याची निर्मिती होत असून शहरातही दिवसेंदिवस प्लॅस्टीक वापर कमी न होता वाढतच आहे. प्लॅस्टीकच्या पिशवीतील चिप्स, मिनरल वॉटरच्या बाटल्या, जूने मोबाईल, प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग आदींवर बंदी आणल्यास बहुतांश समस्या सुटतील. 

दर वर्षी जवळपास सव्वा लाख लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो याबाबत सर्वत्र चिंता व्यकत् केली जाते. ते रास्तच आहे. मात्र दरवर्षी राष्ट्रीय अभयारण्यातून तसेच पर्यावरणातून जैवविविधता नष्ट होत आहे याचे कोणाला सोयरेसुतक नाही, दरवर्षी हजारो प्रजाती नष्ट होण्यास प्लॅस्टिक कारणीभूत आहे हे लक्षात घेवून प्लॅस्टीकचा वापर टाळावा असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.