Tue, Apr 23, 2019 01:59होमपेज › Pune › पिंपरी शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला

पिंपरी शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 12:43AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

शहरातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, शहरात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत आहे. मागील काही दिवसांत शहरातील थंडी वाढली असून, किमान तापमान 10 अंशांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे शहरात रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत किमान तापमानात सातत्याने घट होत असून, नागरिक सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. शहराचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 10 अंश सेल्सअस इतके नोंदवण्यात आले असून, पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण असणार असण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली आल्याने नागरिकांना पहाटेला कडाक्याची, तर दुपारच्या वेळीही थंडी चांगलीच जाणवत आहे.

या थंडीपासून बचाव म्हणून नागरिक पहाटेच्या वेळीही ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडत आहेत. यामुळे स्वेटर, कानटोपी, मफलर, हॅण्डग्लोव्ह्ज यांना मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टँड; तसेच शहरातील विविध भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी ऊन व रात्री थंडी अशा वातावरणाचा शहरवासीय अनुभव घेत आहेत. 
उद्योगनगरीत कामानिमित्त भल्या पहाटे अथवा सकाळी घराबाहेर पडणारा कामागार वर्ग, रिक्षाचालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी वाफाळत्या चहाचा आस्वाद घेत थंडीची मजा लुटताना दिसून येतात; तसेच ऐन थंडीत शरीरसौष्ठव निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण घराजवळच्या बागेत पहाटेच्यावेळी फिरण्यासाठी गर्दी करत आहेत, तर तरूणाईची पावले जिमकडे वळत आहेत. एकंदरीतच पिंपरी-चिंचवड शहरवासीय कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत.