Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Pune › पिंपरी कॅम्पात साफसफाईचा नुसताच देखावा 

पिंपरी कॅम्पात साफसफाईचा नुसताच देखावा 

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:01AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी कॅम्पातील ब्लॉक ‘बी’मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी (दि.8) सकाळी साफसफाई करण्यात आली; तसेच परिसरात कीटकनाशक पावडरची फवारणी करण्यात आली.  ‘एकीकडे स्वच्छता अभियान दुसरीकडे उघड्यावर शौच’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने रविवारी (दि.7) छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुसर्‍या दिवशी सकाळी पिंपरी कॅम्प बाजारपेठेतील ब्लॉक ‘बी’मधील 7 व 8 मधील परिसरात सफाई मोहीम राबविली; मात्र सफाईचा केवळ देखावा केला असून, घाणीचे साम्राज्य पूर्णपणे दूर करण्याची मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे. 

सार्वजनिक शौचालय व मुतारी स्वच्छ करण्यात आली. कीटकनाशक औषधफवारणी केली गेली; मात्र सफाईचा हा केवळ देखावा होता. अद्याप परिसरात दुर्गंधी कायम आहे. या परिसरात नियमितपणे स्वच्छता व्हावी, गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बंद असलेले येथील सार्वजनिक शौचालय काढून टाकावे, अंतर्गत गल्लीतील ब्लॉक अनेक दिवसांपासून काढून ठेवले आहेत, त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी यांनी केली आहे.