होमपेज › Pune ›  क्लस्टरमध्ये मागासवर्गीय उद्योजकांना घ्या 

 क्लस्टरमध्ये मागासवर्गीय उद्योजकांना घ्या 

Published On: Feb 05 2018 1:31AM | Last Updated: Feb 05 2018 1:25AMपिंपरी ः प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया प्रकल्पांअंतर्गत देशभरात क्लस्टर विकसीत करण्यात आले आहे. या मध्ये मागासवर्गीय नव उद्योजकांना व प्रशिक्षणार्थींना आगामी काळात समाविष्ट करुन घेतले जावे, असे प्रतिपादन एमएसएमईचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) गिरीराज सिंह यांनी चिंचवड येथे केले. चिंचवड येथील पुणे इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने ‘पुणे व्हेंडेंक्स 2018’ अंतर्गत प्रदर्शनाचे उद्धाटन गिरीराज सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. खासदार अमर साबळे, महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, पुणे इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक, अध्यक्ष सागर शिंदे, विजय देशमुख, राजेश चव्हाण, संतोष तिडके, एमएसएमईचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष योगेश बाबर आदी या वेळी उपस्थित होते. 

मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, मागील तीन वर्षात उद्योग व्यवसायास अनुकूल धोरण राबवून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे भारतात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीचा ओघ वाढला आहे. यामधून प्रत्यक्ष 70 लाख रोजगार निर्मिती झाली आहे. एमएसएमईतून एकूण रोजगाराच्या 80 टक्केरोजगार अप्रत्यक्ष निर्माण होतो. या सरकारने एमएसएमईच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. जाती धर्माच्या राजकारणामुळे यावर प्रतिकूल परिणाम होता. आगामी अर्थसंकल्पात 50 कोटी नागरीकांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. पुणे इंजिनिअरींग क्लस्टरचे काम गुणवत्तापुर्ण आहे. त्यामुळेच येथून प्रशिक्षण घेतलेल्या सर्व युवकांना रोजगार मिळाला आहे.  

पुणे इंजिनिअरींग क्लस्टरचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी सांगितले की, चिंचवड येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सरकारी अध्यादेशानुसार केंद्र व राज्य सरकारच्या अंगीकृत कंपन्यांनी 20 टक्केखरेदी लघु उद्योजकांकडून करावी असे आदेश आहेत.