Mon, Nov 19, 2018 09:27



होमपेज › Pune › अपंगांना दरमहा दोन हजार ‘पेन्शन’

अपंगांना दरमहा दोन हजार ‘पेन्शन’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील 5 वर्षांवरील 40 टक्के अपंगत्व असलेल्या सर्वांना दरमहा दोन हजार रुपये पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘पेन्शन’ देण्यात येणार आहे. त्यासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा नसून, संबंधित शहरात 3 वर्षांपासून वास्तवास असावा, ही अट असणार आहे. हा ठराव उपसूचनेसह सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. 

तहकूब सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.28) झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे अपंग कल्याणकारी योजना राबविण्यात येते. त्याअंतर्गत अपंग व्यक्तींसाठी विविध योजना अमलात आणण्यात येतात. 28 ऑक्टोबर 2015 च्या शासन निणर्यानुसार महापालिकांकडे अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेला 3 टक्के निधी हा त्याच महापालिका क्षेत्रातील नागरी भागातील अपंगांसाठी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

त्याअंतर्गत 5 वर्षांवरील 40 व त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या सर्व व्यक्तींना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या योजनेचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय पेन्शन योजना असणार आहे. या योजनेसाठी अंधांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. या विषयावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम, सचिन चिखले, उत्तम केंदळे, जावेद शेख, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सहभाग घेतला. 

या संदर्भात खुलासा करण्याची मागणी बहल यांनी केली. त्यावर प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी योजनेची माहिती दिली. शासनाच्या 2016 च्या नियमानुसार 40 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तींनाच त्याचा लाभ देण्याच्या सूचना असल्याचे स्पष्ट केले. शहरात या वर्गातील एकूण 1 हजार 804 अंपगांची नोंद असून, दीड हजार रुपयांप्रमाणे वर्षाला 3 कोटी 24 लाख रुपये निधी लागणार असून, तो निधी उपलब्ध आहे. 

अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खर्च येतो, त्यामुळे वयाची 18 वर्षे अट रद्द करून ती कमी करण्याची मागणी मंगला कदम, उत्तम केंदळे यांनी केली. पेन्शनची रक्कम वाढविण्याची मागणी बहल, चिखले यांनी केली. जन्मापासूनच अपंगांना लाभ द्यावा, असेही बहल म्हणाले. लाभासाठी केशरी रेशन कार्डची अट रद्द करण्याची मागणी शेख यांनी केली. अंधांनाही लाभ देण्याची मागणी शेख, चिखले यांनी केली. या योजनेस पंडित उपाध्याय नाव द्यावे. वयाची अट 5 वर्षांवरील करावी. पेन्शन दीडवरून दोन हजार करावी. अंधांसाठी अट नसावी, अशी उपसूचना एकनाथ पवार यांनी मांडली, ती महापौर काळजे यांनी स्वीकारली.