Fri, Apr 26, 2019 17:32होमपेज › Pune › ‘बीआरटी’वरून भाजपमध्ये वाद

‘बीआरटी’वरून भाजपमध्ये वाद

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:32AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

महापालिकेच्या वतीने दापोडी-निगडी ‘बीआरटी’ मार्गावर बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू असतानाच ‘बीआरटी’वरून पक्षात वाद उफाळला आहे. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना ज्या भाजपने ‘बीआरटी’ला विरोध करून आंदोलने केली त्या भाजपने सत्तेत आल्यानंतर ‘बीआरटी’ सुरू करण्याचा घाट घालणे क्लेशदायक असल्याची टीका पक्षाचे शहर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केली आहे. त्या वेळी विरोधात आणि आज पक्षनेते असलेल्या एकनाथ पवार यांनी या प्रकल्पास विरोध न केल्याबद्दलही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

याबाबत दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निगडी ते दापोडी ‘बीआरटी’ धोकादायक आहे, त्यामुळे भाजपाचा त्यास सन 2008 पासून विरोध आहे. शहरात ‘बीआरटी’ मार्गाच्या बसथांब्याचे काम 2008 मध्ये काळभोरनगर येथे सुरू झाले,  त्या वेळी 25 डिसेंबर 2008 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाने बसथांबा उद्ध्वस्त केला होता. राष्ट्रवादीची 2008 ते 2017 या कालखंडात पालिकेत सत्ता असताना त्यांनी ‘बीआरटी’ रेटून नेण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम राष्ट्रवादीचा असल्याने त्यांनी तो राबविण्याचा प्रयत्न करणे समजू शकते; मात्र ज्या भाजपाने या प्रकल्पास विरोध केला त्या भाजपानेच हा प्रकल्प राबविण्याचा घाट घालणे चुकीचे आहे, असे दुर्गे यांनी म्हटले आहे. ‘बीआरटी’मुळे मनुष्यहानी झाल्यास त्याचे खापर भाजपावरच फुटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.