होमपेज › Pune › पंचगंगा अपघातामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पंचगंगा अपघातामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 12:29AMनंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी चालकाचा ताबा सुटून भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर शिवाजी कठडा तोडून थेट पंचगंगा नदीत 100 फूट खोल कोसळली शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातात बालेवाडी येथील 13 जण ठार झाले या अपघातामुळे रस्ता सुरक्षेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे वाढत्या लोकसंखेच्या प्रमाणात उपलब्ध नसलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व चंगळवाद यामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अपघात टाळण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी अपघाताची जागा ,वळणे याबाबत मार्गदर्शक फलकांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.  मात्र आपल्या जीविताची काळजी आपणच घेत नाही.

रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढत आहे.  त्यास अरुंद रस्ते आणि अति रुंद रस्ते हे दोन्ही घटक कारणीभूत आहेत.  रस्ते रुंद होत आहेत तसतशी बेदरकारपणे वाहने चालविण्याची वृत्ती वाढत आहे.  रस्त्यांची दुरवस्था ,खड्डे ,मद्यपान करून वाहन चालविणे ,क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक ,चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक  आदी अपघातांची विविध कारणे आहेत.  यातील वाहनातले तांत्रिक दोष ,गाडी स्लिप होणे यासारखी कारणे वगळता जे आपल्या नियंत्रणात आहे. त्याबाबत काळजी घेतल्यास अपघात टाळता येतील.  2015 मध्ये देशात रस्ते अपघातात 1 लाख 46 हजार 133 जणांचा मृत्यू झाला होता.

भारतात रोज रस्ते अपघातात किमान 400 जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जून 2016 मध्ये दिली होती.   रस्ते अपघाताबाबत 2015 सालचा अहवाल जारी करताना, त्यानी  ‘या अहवालाने मी फारच व्यथित झालो आहे. भारतात दर तासाला 57 अपघात होतात आणि त्यात 17 जणांचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणार्‍यांत 54 टक्के लोक तरुण म्हणजे 15 ते 34 वयांतील असतात.’  गेल्या दोन वर्षांत आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, पण  फारसा बदल झाला नाही. यापुढे असे आम्ही होऊ देणार नाही. असे अभिवचन  गडकरी यांनी दिले होते मात्र   2015 मध्ये झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी 77.12 टक्के अपघातांना ‘चालकाची चूक’ कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद केल्याचे लक्षात घेता रस्ते अपघात रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर असलेल्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. पंचगंगा अपघातामुळे त्यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. 

मदत करणारांचे कौतुक हवे 

 अपघातानंतर मदतीला कोणीच धावत नाही असे चित्र अनेकदा दिसते पंचनामा अन पोलिसांची  शुक्लकाष्ट मागे लागायला नकोत या भावनेने  अनेकजण बघ्याची भूमिका घेतात तातडीने उपचार मिळू न शकल्याने कित्येक अपघातग्रस्त प्राणाला मुकतात . पंचगंगा  अपघातग्रस्तांना मदत करून कोल्हापूरकरांनी माणुसकीचे दर्शन घडविले  अपघातग्रस्तांना अशी मदत करणारांचे कौतुक झाले पाहिजे .पोलिसांविषयी लोकांच्या मनात असणारी भीती चांगल्या अर्थाने कमी झाली तरी अपघातग्रस्तांना मदतीसाठी असंख्य हात पुढे येतील.