Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Pune › नववर्षाच्या स्वागताची लगबग तरुणाईचा उत्साह शिगेला

नववर्षाच्या स्वागताची लगबग तरुणाईचा उत्साह शिगेला

Published On: Dec 11 2017 1:33AM | Last Updated: Dec 11 2017 12:47AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

 2017 हे वर्ष संपायला अवघे तीन आठवडे उरले असून, नवीन वर्षांच्या स्वागतासाठी शहरवासीयांची लगबग सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वस्तू दाखल झाल्या असून, वस्तू खरेदीसाठी तरुणाई उत्सुक  आहे. पिंपरी कॅम्पसह विविध भागात नवनवीन वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या असून, शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध संस्था व संघटनांतर्फे
तयारी सुरू आहे.  

कॉलेजच्या कट्ट्यावर थर्टीफर्स्टच्या गप्पा रंगत असून, नवीन वर्षात काय संकल्प करणार याबाबत चर्चा ऐकायला मिळत आहे. 31 डिसेंबरला यंदा रविवार आल्याने थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी अनेकांनी नवनवीन बेत आखले आहे. युवा वर्गाकडून पर्यटनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे; तर नोकरदार मंडळींनी कुटुंबीयांसह पर्यटनस्थळी हॉटेल्स बुक केली आहेत. स्थानिक पातळीवरही ग्राहकांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देत नववर्षासाठी रुचकर पदार्थांचे नियोजन हॉटेल व्यावसायिकांनी आतापासूनच केल्याचे दिसत आहे. सोबतीला नृत्य-संगीताच्या कार्यक्रमांमुळे थर्टीफर्स्टची लज्जत मिळणार आहे. सार्वजनिक मंडळे तसेच विविध संस्था व राजकीय पक्षांच्या वतीने शुभेच्छा फलक तयार करण्यात आले असून, त्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सिनेतारका व अभिनेत्यांना पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती एका कार्यकर्त्यांने दिली.