Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Pune › ग्रामीण भागाला मिळेल इथेनॉलमुळे नवसंजीवनी

ग्रामीण भागाला मिळेल इथेनॉलमुळे नवसंजीवनी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या समस्या, वायुप्रदूषण, ग्रामीण भागातील बेरोजगारी या तिन्हींवर इथेनॉल हा उत्तम उपाय आहे. इथेनॉल निर्मितीमुळे ग्रामीण भागाला नवसंजीवनी मिळेल,असा विश्‍वास केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.भोसरी येथील सीआयआरटी (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट) येथे शुक्रवारी (दि.24) आयोजित करण्यात आलेल्या ‘इथेनॉल हे वाहन इंधन’ परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री 

धर्मेंद्र प्रधान, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, माजी मंत्री अण्णासाहेब एम. के पाटील, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे आदी उपस्थित होते. नागरिकरण रोखण्यासाठी खेड्यांत उद्योग हवेत ग्रामीण भागातील नागरिक रोजगार न मिळाल्याने तो शोधात शहरांकडे येत आहेत. सध्या खेडेगावांत लोकसंख्या कमी होऊन शहरी भागात वाढत आहे. ही देशापुढील मोठी समस्या आहे. या समस्येचे उत्तर म्हणजे गावाकडे उद्योग सुरू करणे आवश्यक आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, ग्रामीण भागात सुधारणा होण्याच्या दृष्टीने पुढील काळात इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारखाने गावोगावी निर्माण होतील. त्यातून ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल; तसेच मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. यंदा उसाचे उत्पादन चांगले आहे, यामुळे इथेनॉलचे उत्पादन चांगले होऊ शकते. एक टन भाताच्या तणसापासून 280 लिटर इथेनॉल तयार होते. साखर कारखाने उसाच्या पाचटापासून इथेनॉलनिर्मिती करतील.  सरकारने बांबूला ‘गवत’ म्हणून मान्यता दिली आहे. बांबूचे अनेक उपयोग आहेत. हजारो हेक्टर मोकळ्या जमिनीवर बांबूची लागवड करून, त्यापासून देखील इथेनॉल हा इतर इंधनासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हे इथेनॉल विविध ठिकाणी उपयोगात आणू शकतो. इथेनॉलचे उत्पादन वाढेल, इथेनॉल फायदेशीर ठरेल आणि साखर कारखाने वर्षभर चालू राहतील. त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल. ऊस शेतीबरोबरच बांबूंची शेती करण्यावर भर दिला गेला पाहिजे.