होमपेज › Pune › वीस रुपयांची पाणी बाटली ५० रुपयांस

वीस रुपयांची पाणी बाटली ५० रुपयांस

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:47AM

बुकमार्क करा

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृह चालकांकडून प्रेक्षकांची आर्थिक लूट केली जात आहे. पाण्याची बाटली 20 रुपये असताना ती तब्बल 50 रुपयांना विकली जात आहे. त्याच पद्धतीने खाद्यपदार्थही अव्वाचा सव्वा दराने प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत.  पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे आहेत. त्यांचे तिकीट दरही भरमसाट आहेत. तेथे एका पाण्याची बाटली 20 ऐवजी तब्बल 50 रुपयांना विकली जात आहे.

तहान लागल्याने प्रेक्षकांना नाईलाजास्तव महागड्या किमतीची पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थही महागड्या दराने विकत घ्यावे लागत आहेत; तसेच वाहनतळ सुविधा मोफत देणे सक्तीचे असताना त्यासाठीही अव्वाचा सव्वा शुल्क आकाराले जात आहे. परिणामी, प्रेक्षकांची आर्थिक लूट होऊन त्यांना नाहकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. या प्रकाराबाबत ग्राहक हक्क संघर्ष समितीचे शहराध्यक्ष अमोल उबाळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस आयुक्त कार्यालय, महापालिकेचे आयुक्त, अन्न व औषध पुरवठा विभागाचे आयुक्त, ग्राहक तक्रार निवारण आदी विभागांकडे तक्रार  केली आहे.