Wed, Apr 24, 2019 21:53होमपेज › Pune › मेट्रो निगडीपर्यंत धावण्यासाठी प्रयत्न सुरू

मेट्रो निगडीपर्यंत धावण्यासाठी प्रयत्न सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत होण्यासाठी महापालिका स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल 

कॉर्पोरेशनला कळविण्याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे; तसेच निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी किती खर्च येणार आहे, याची महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनकडून माहिती मागविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रोचा पहिला मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गाचे काम पिंपरी-चिंचवडपासून सुरू करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोची सहा स्टेशन असणार आहेत. त्याअंतर्गत नाशिक फाटा येथे मेट्रो प्रकल्पाचे पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. पिंपरीच्या मार्गावर उभारण्यात येत असलेल्या अन्य पिलरचे कामही युद्धपातळीवर केले जात आहे.

परंतु, मेट्रोचा प्रकल्प निगडीपर्यंत राबविण्याची शहरातील नागरिकांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांना महापालिकेत बोलावून निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा केली. निगडीपर्यंत मेट्रो करण्याची नागरिकांची मागणी रास्त असल्याने त्यावर अंमलबजावणी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी काय काय प्रशासकीय कार्यवाही करणे अपेक्षित आहे, याची अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. संबंधित अधिकार्‍यांनीही निगडीपर्यंत मेट्रो करण्यात काहीच अडचण नसल्याचे सांगितले.

त्यानंतर सावळे यांनी आयुक्त हर्डीकर व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पत्र देऊन निगडीपर्यंत मेट्रो करण्याच्या प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कळविण्यात यावे, असे त्यांनी आयुक्तना पत्र दिले आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प करण्यासाठी किती खर्च येणार आहे, याची कॉर्पोरेशनकडून माहिती मागविण्याची मागणीही सावळे यांनी केली आहे.