Sun, Apr 21, 2019 01:50होमपेज › Pune › दुकानदारांकडून सर्रास होतेय मापात पाप

दुकानदारांकडून सर्रास होतेय मापात पाप

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 10:22PM

बुकमार्क करा

पूनम पाटील

पिंपरी ःवातार्ताहर

पूर्वी वजनकाट्याबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्यात आले; मात्र असे असले, तरी आजही दुकानदार मापात पाप करत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.  खासकरून किरकोळ मालाचे वजन करताना घोळ केला जात असून, एका वस्तूमागे दोन ते चार रुपये अधिक आकारण्यात येत असल्याची तक्रार गृहिणींनी केली आहे. 
शहरात गल्लोगल्ली किराणा मालाची दुकाने थाटलेली दिसतात.

दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत असून, त्यामुळे या छोट्या दुकानदारांनाही वेळेअभावी मागणी असून, किरकोळ वस्तूही एमआरपीपेक्षा अधिक दराने विकल्या जात असल्याचे चित्र आहे. काट्याव्यतिरिक्त बरेच दुकानदार हे थंड पेयांना ‘कूलिंग चार्जेस’ लावून ग्राहकांकडून दोन ते चार रुपये अधिक घेत आहेत. अनेक वस्तुंवरील किमतीच गायब झाल्या आहेत; तसेच  उत्पादकाचे नाव, माल बनवल्याची तारीख व एक्स्पायरी डेट ब्रेड, बिस्कीट पुडे यांसारख्या वस्तूंवरून गायबच झाल्या आहेत. खासकरून बेकरीमध्येही तारीख उलटून गेलेले बे्रड व अन्य पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळे माल खराब निघाल्यास कोणाकडे तक्रार करायची असा प्रश्‍न ग्राहकांना पडला आहे. 

नागरिकांना व्यावसायिकांकडून पक्की बिले दिली जात नाहीत. एखाद्या कागदावर काहीतरी लिहून दिले जाते; तसेच अनेकदा कीड लागलेले धान्य, डाळी; तसेच इतर भेसळयुकत पदार्थ दिले जातात. अशा वेळी संबंधित विभागाकडे तक्रार केली, तरी कारवाई मात्र होत नाही. त्यामुळे या व्यापार्‍यांचे फावत असून, दिवसेंदिवस भेसळयुक्त माल विकला जात आहे.