Tue, Apr 23, 2019 13:45होमपेज › Pune › फलक मराठीत न लावल्यास फौजदारी

फलक मराठीत न लावल्यास फौजदारी

Published On: Dec 13 2017 2:37AM | Last Updated: Dec 13 2017 2:33AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी  

शहरातील सर्वच दुकानदार, व्यावसायिक, कंपन्या, हॉटेल्स आणि आस्थापनांनी आपल्या दर्शनी भागात मराठी भाषेत फलक न लावल्यास शासनाच्या मदतीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यानंतर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. राज्य शासनाने 5 डिसेंबरला अध्यादेश काढून बँकिंग, दूरध्वनी, टपाल, विमा, रेल्वे, मेट्रो, मोनो रेल, विमान प्रवास, पेट्रोलियम, मोबाईल, दुकाने, हॉटेल्स आदी सेवा पुरविणार्‍या केंद्रांत; तसेच सरकारी व खासगी सर्व विभाग आणि कार्यालयांत मराठी भाषेचा वापर केला जावा; तसेच तेथील नामफलक मराठी भाषेत ठळक अक्षरांत असावेत, असे निर्देश दिले आहेत.

त्यासंदर्भातील आवाहनात्मक पत्र शहरातील सर्व दुकानदार, व्यापार्‍यांना देण्यात येत आहे. या माध्यमातून जनजागृती केली जात असून, 15 दिवसांत त्यास प्रतिसाद न दिल्यास कायद्याचा भंग केला म्हणून संबंधित दुकानदार व व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. त्यानंतरही अंमलबजावणी न केल्यास मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा मंगळवारी (दि.12) झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. बँकांना मराठीत कामकाज करण्याबाबत 10 दिवसांपूर्वी पत्र दिले आहे. फेरवाल्याबाबत बोटचेपे धोरण  शहरात सर्वच प्रमुख रस्त्यांवर फेरीवाले, हातगाडी विक्रेते, पथारीवाले आणि टपरीधारकांनी अतिक्रमण करून बस्तान बसविले आहे.

त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. यामध्ये पालिकेच्या अधिकार्‍यांसह पदाधिकारी सामील असल्याची चर्चा आहे. या विरोधात मुंबईपाठोपाठ पुण्यात मनसेने आंदोलन केले. मात्र, शहरात मनसेने अद्याप काहीच केलेले नाही, यामुळे मनसेच्या बोटचेपे धोरणाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या संदर्भात विचारले असता, मनसे शहरप्रमुख सचिन चिखले यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले असून, मुदतीमध्ये प्रशासनाने कारवाई न केल्यास न्यायालयाच्या अवमानप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.