Thu, Nov 15, 2018 01:06होमपेज › Pune › महावितरणपुढे वीजचोरी रोखण्याचे आव्हान

महावितरणपुढे वीजचोरी रोखण्याचे आव्हान

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 1:02AM

बुकमार्क करा

 पिंपरी : प्रतिनिधी

शहरातील वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. कर्मचार्‍यांच्या पथकाद्वारे वीजचोरीबाबत तपासणी केली जात आहे. यामध्ये चोरी करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. मागेल त्याला त्वरित वीजजोडणी देण्याची योजना आखली आहे; मात्र कारवाई होऊनही शहरातील वीजचोरीची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वीजचोरांपुढे महावितरण कार्यालयही हतबल झाले आहे. शहरातील महावितरण कार्यालयाला सध्या वीजचोरी व वीजगळतीच्या प्रश्‍नांचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात आकडे टाकून उघडपणे नागरिक वीजचोरी करत आहेत;  मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात महावितरणला अपयश येत असल्याचे चित्र आहे. 

वीजचोरी रोखण्यासाठी कार्यालयाकडून विविध योजना आखल्या होत्या. यामध्ये मागेल त्याला त्वरित वीजजोड देण्याची योजना होती. यामध्ये महावितरणचे कर्मचारी प्रत्येक प्रभागात तपासणीसाठी फिरतात. ज्यांना नवीन वीजजोड पाहिजे, अशा ग्राहकांनी महावितरणशी संपर्क साधल्यास त्यांना त्वरित वीजजोड दिले जात आहेत; तसेच वीजचोरी रोखण्यासाठी संबंधित विभागातील कर्मचार्‍यांचे पथक नेमले आहे. या पथकाद्वारे वीजचोरीबाबत तपासणी केली जात आहे. वीजचोरी उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. वीजचोरी कशासाठी केली आहे, किती लोड आहे हे पाहून दंड आकारला जात आहे.  महावितरणकडून विविध योजना राबविल्या जात आहेत; मात्र या योजनांकडे ग्राहक पाठ फिरवत असल्याचे दिसते. दिवसाला लाखो रुपयांची वीजचोरी होत आहे. त्यामुळे इतर लोकांना वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागत आहे. याबाबत वीजवितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.