Mon, Jun 24, 2019 17:12होमपेज › Pune › तर गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू 

तर गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू 

Published On: Dec 13 2017 2:38AM | Last Updated: Dec 13 2017 2:12AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

मराठी क्रांती मोर्चाच्यावतीने 9 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या मागण्यांवर सरकारने या हिवाळी अधिवेशनात चर्चा करावी व या मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा नागपूर येथे सोमवारी (दि.18) विधानसभेवर गनिमी काव्याने सरकारला धडा शिकविण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबा पाटील यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिला. 
या वेळी पाटील म्हणाले की, 9 ऑगस्ट रोजी निघालेल्या मराठा क्रांती महामोर्चाने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते. गेल्या वर्षभरात राज्यभरातून निघालेल्या 58 मोर्चांची निवेदने शासनाकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविली. मात्र, मागण्यांवर सरकारने कोणतेही निर्णय घेतले नाहीत. 29 ऑक्टोबर 2017 रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मराठा महासभेत सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. सरकारने हिवाळी अधिवेशनात मागण्यांबाबत चर्चा घडवून न आणल्यास सरकारला धडा शिकवू.

मराठा समाजासाठी सरकारने मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली आहे. मात्र, चंद्रकांतदादा पाटील हे मराठा चळवळीत फूट पाडत असून, मीच मराठा समाजाचा नेता आहे, असे भासवत आहेत. त्यामुळे त्यांना उपसमितीतून हटवावे, अशी आमची मागणी आहे, तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका मांडावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 9 ऑगस्टच्या मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सामील झालेल्या सहा युवकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या परिवारास शासनाने मदत द्यावी; तसेच एक युवक नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे, त्याचा खर्च शासनाने करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

अ‍ॅट्रासिटी कायद्याचा राजकीय वापर होऊ नये यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. शिवस्मारकाचे काम मार्गी लावावे, सारथी प्रशिक्षण संस्था सुरू करावी, 605 कोर्समध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, तंत्रशिक्षण समाविष्ट करावे. एमपीएससी, यूपीसएसी करणार्‍या मराठी तरुणांना अनुदान द्यावे. इंजिनिअरिंग, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात ओबीसींप्रमाणे फी सवलत द्यावी. अण्णासाहेब पाटील मराठा विकास आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या. या पत्रकार परिषदेस विद्या पाटील, संभाजी बालघरे, जितेंद्र पाटील, अनिरुद्ध शेलार, बळीराम काटके, संतोष इंदुलकर, अंकुशराव कापसे आदी उपस्थित होते.