Sat, Jul 20, 2019 23:52होमपेज › Pune › नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांचे सभापतिपद रद्द करा

नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांचे सभापतिपद रद्द करा

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 04 2018 12:14AMपिंपरी : प्रतिनिधी

भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्रात त्यांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी व स्थावर मालमत्तेविषयी जाणीवपूर्वक माहिती लपवून निवडणूक आयोग,  महापालिका, जनतेची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर मोशी येथील जमिनीच्या खरेदी-विक्रीत घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांचे सभापतिपद रद्द करण्याच्या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने उपोषण सुरू केले आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे उपोषण सुरू आहे.

संघटेनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख, राजश्री शिरवळकर, हरिश्‍चंद्र तोडकर, सँड्रा डिसूझा आदींचा उपोषणात सहभाग आहे.नगरसेवक सस्ते यांनी त्यांच्या 14 गुंठे जागेची 17 गुंठे जागा दाखवुन दुबार व बोगस खरेदी केली. एकच जागा दोघांना विकली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे भोसरी जमीन खरेदी प्रकरणात मंत्रिपद काढून घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पारदर्शक कार्याची पावती दिली होती; तसाच प्रकार मोशीमध्ये नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी केला आहे; परंतु त्यांना स्थानिक भाजपा नेत्यांचे अभय मिळत आहे. त्यामुळेच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असताना, कसलीही पात्रता नसताना फक्‍त गुंडशाही व झुंडशाहीच्या जोरावर त्यांना क्रीडा समिती सभापतिपद देण्यात आले आहे. 

लक्ष्मण सस्ते यांनी आपल्याकडील शेतीच्या मालमत्तेबाबतची माहिती निवडणूक आयोगापासून लपविलेली आहे. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. फसवणुकीचा  गुन्हा दाखल आहे. शौचालयाचा दाखल्यावर आवाक-जावक क्रमांक, दिनांक, आरोग्य निरीक्षकाचे नाव नसल्याने बोगस असल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे त्यांना दिलेले पद त्वरित रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.  या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मेहबूब शेख, गणेश पवार, संगीता शहा व सविता लखन यांनी भेट देऊन सहभाग नोंदवला.