Fri, Apr 26, 2019 03:40होमपेज › Pune › विमा योजनेची माहिती कामगारांनाच नाही

विमा योजनेची माहिती कामगारांनाच नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रदीप लोखंडे 

 राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत कामगारांसाठी सुरू केलेले मोहननगर येथील रुग्णालय समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. कामगारांसाठी सुरू केलेली ही योजना त्यांच्यापर्यंत व्यवस्थित न पोचल्याने या योजनेविषयी त्यांनाच माहिती नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासकीय लाभापासून अनेक रुग्ण वंचित राहण्याची शक्यता आहे. मोहननगर येथे विमा कामगारांसाठी असणार्‍या या रुग्णालयाचादेखील लाभ कामगारांना होत नसल्याचे चित्र आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्यागिक शहर असल्याने या ठिकाणी लाखोंच्या संख्येने कामगार काम करतात. कंपन्यांत काम करताना त्यांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून कामगार विमा योजनेअंतर्गत सुरू केलेल्या रुग्णालयात मोफत औषधोपचार दिले जातात. यासाठी विमा योजनेचे कार्ड असावे लागते; मात्र कामाला लागून 6 ते 7 वर्षे होऊनही या योजनेविषयी आणि कार्ड काढण्याविषयीची माहिती कामगारांना नसते. अनेकांना तर एखादा अपघात झाल्यावरच या योजनेची माहिती होते. 

औषधोपचार मिळविण्यासाठीची पुढील प्रक्रिया करताना व मोफत औषधोपचाराच्या सोयी मिळविण्यासाठी अनेक फॉर्म भरावे लागतात. या वेळी कागदपत्रांची जमवाजमव करताना त्यांच्या कुटुंबीयांची पळापळ होऊन हाल होत आहेत. आजारापेक्षा सुविधा मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेचेच दुखणे अधिक असल्याची भावना कामगारांत व्यक्त होत आहे. अनेक कामगार रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात; मात्र त्यांना व्यवस्थित माहिती सांगितली जात नाही. डॉक्टरांकडून व कर्मचार्‍यांकडून उलटसुलट उत्तरे दिली जातात, अशी चर्चा कामगारांत असते. 
जनजागृतीकडे दुर्लक्ष

कामगारांना या योजनेची माहिती होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. ही योजना काय आहे हे त्यांना समजावून सांगितले पाहिजे. काहींना या योजनेची वर्षानुवर्षे माहिती नसते. त्यांना एखादा अपघात झाल्यानंतरच या विषयी माहिती मिळत आहे.