Sat, Nov 17, 2018 02:38



होमपेज › Pune › कासारवाडी शाळेसाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध

कासारवाडी शाळेसाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध

Published On: Jan 30 2018 2:19AM | Last Updated: Jan 30 2018 2:19AM



पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्‍या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन यांच्या खासदार निधीतून 3 कोटी रुपयांचे आर्थिक साह्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले असून, कागदपत्रे सादर करून हा निधी घेण्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्तांना नुकतेच प्राप्त झाले आहे.  या निधीसाठी स्थानिक नगरसेवक श्याम लांडे पाठपुरावा करीत आहेत. कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या  आवारात 5 मजली प्रशस्त शाळा महापालिका बांधणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च असून, त्या खर्चास स्थायी समितीने 26 डिसेंबरला मंजुरी दिली आहे.

दोन वर्षांत इमारत बांधली जाणार आहे. एकूण भूखंडाचे क्षेत्र 8 हजार 911.30 चौरस मीटर आहे. सद्यःस्थितीत शाळेचे क्षेत्र 3 हजार 789.21 चौरस मीटर आहे. 2 हजार 861.81 चौरस मीटरमध्ये  बांधकाम करण्यात येणार आहे. नगरसेवक लांडे यांच्या मागणीनुसार आयुक्तांनी निधी मागण्यासाठी खा. रेखा यांना पत्र पाठविले. त्याला रेखा यांनी प्रतिसाद देत  जानेवारी 2018 ला जिल्हा नियोजन समितीकडे पत्र पाठवून निधी वर्ग करण्याची सूचना केली. त्यानुसार हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नुकताच वर्ग झाला आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकार्‍यांनी 24 जानेवारीला आयुक्त हर्डीकर यांना पाठविले आहे.