Sat, Aug 17, 2019 16:13होमपेज › Pune › ‘पवना’ तीन महिन्यांत जलपर्णीमुक्त करणार

‘पवना’ तीन महिन्यांत जलपर्णीमुक्त करणार

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:54AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी जलपर्णीमुक्त करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थांसोबत पिंपरी-चिंचवड महापालिका सक्रिय होणार आहे. यासंदर्भात महापालिकेत सोमवारी (दि.11) बैठक झाली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, खासदार श्रीरंग बारणे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा साळवे, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, अधिकारी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होतेे. शहरातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरातून वाहणारी पवना नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी रावेत ते दापोडी नदीपात्र स्वच्छ केले जात आहे. त्या उपक्रमाची माहिती बैठकीत देण्यात आली. 

दर रविवारी शहरातील विविध 24 संस्था एकत्रित येऊन हे काम करीत आहेत. या कामात महापालिकाही सहभागी होणार आहे. सध्या महापालिकेने नेमलेल्या ठेकेदारांमार्फत जलपर्णी स्वच्छ केली जात आहे. त्याचा खर्च महापालिका करीत आहे. हा खर्च ठेकेदारांमार्फत सामाजिक संस्थांना देण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. यासंदर्भात सविस्तर अहवाल येत्या 3 दिवसांत देण्याचा सूचना पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना देण्यात आल्या. स्वयंसेवी संस्थांनी देहू येथील नदी जलपर्णीमुक्त केली आहे. त्याच पद्धतीने शहरातून वाहणार्‍या पवना नदीतील जलपर्णी काढून ती स्वच्छ केली जाणार आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून, दर रविवारी हा उपक्रम शहरातील विविध भागांत राबविला जात आहे. त्यास विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या मोहिमेत महापालिका प्रशासनही सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहन देणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या 3 महिन्यांत पवना नदी स्वच्छ करून ती जलपर्णीमुक्त करण्याचा मनोदय स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला आहे. त्यास महापालिकेसह पदाधिकार्‍यांनी पाठबळ दिले आहे.