Sun, Nov 18, 2018 09:09होमपेज › Pune › ‘एक व्यक्ती एक पद’ची अंमलबजावणी करा

‘एक व्यक्ती एक पद’ची अंमलबजावणी करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी :नंदकुमार सातुर्डेकर

 भाजपमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेत आणि संघटनेत अशी दोन दोन पदे ज्यांच्याकडे असतील त्यांनी संघटनात्मक पदांचे राजीनामे द्यावेत, असे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाच्या बैठकीत दिले.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत याआधी पिंपरीतील हॉटेल कलासागर येथे बैठक झाली होती. त्या बैठकीत आपण यापुढे आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी पुण्यात माउली गार्डन येथे ही बैठक घेतली. त्या वेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे,  संघटक सरचिटणीस माउली थोरात, अमोल थोरात, उपाध्यक्ष मोरेश्‍वर शेडगे, उमा खापरे आदी उपस्थित होते.

या बैठकीस भाजपच्या कार्यकारिणीतील 60 पैकी 30 पदाधिकारी, सहा मंडल अध्यक्षांपैकी 3 अध्यक्षच उपस्थित होते. बैठकीत दानवे यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. बूथरचना झाली का? मंडलाची कार्यकारिणी, विविध आघाड्यांचे संयोजक, कार्यकारिणी झाली का? विस्तारक पद असणार्‍यांचे काम योग्यरीत्या सुरू आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. त्या वेळी सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी एकेकाकडे दोन-दोन तीन-तीन पदे असल्याने विस्तारकांची कामगिरी बरी नसल्याचे निदर्शनास आणले. तोच धागा पकडून, भाजपमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मी स्वतः प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, याची आठवण दानवे यांनी करून दिली व ज्यांच्याकडे महापालिकेचे आणि संघटनात्मक अशी दोन पदे आहेत, त्यांनी संघटनात्मक पदाचा राजीनामा द्यावा, असे आदेश दिले.

संघटनेचे काम होणे महत्त्वाचे आहे. नुसती आपापली प्यादी बसवायची म्हणून कोणाला पदे देऊ नका, या शब्दांत दानवे यांनी या बैठकीत पदाधिकार्‍यांना सुनावल्याचे समजते. बूथरचना केवळ 60 टक्के झाली असल्याबाबतही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केल्याचे समजते. या बैठकीत काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभाराबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.