Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Pune › नागरिकांनो, हेल्मेट घ्या जपून!

नागरिकांनो, हेल्मेट घ्या जपून!

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:30AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करत असतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वाहनचालक हेल्मेट खरेदीसाठी पिंपरीतील हेल्मेट दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्याचबरोबर हेल्मेटची मागणी वाढणार असल्याने बाजाराबरोबरच रस्त्याच्या बाजूलाही हेल्मेट विक्री सुरू असल्याचे दिसते; मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात 

हेल्मेटचा काळाबाजार होण्याची भीती नागरिकांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली. धास्तावलेल्या दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटच्या दुकानांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे पाहून, याचा फायदा घेत हेल्मेटच्या किमती वधारल्या आहेत. दुकानदारांनी सांगितलेली किंमत ग्राहकांना द्यावी लागत आहे. शहरातील वाहनाचे सुटे भाग विकणार्‍या दुकानांत मोठ्या संख्येत हेल्मेट विक्रीस उपलब्ध आहेत; मात्र केवळ हेल्मेटची विक्री करणार्‍या दुकानांत आणि इतर दुकानांत एकाच कंपनीच्या हेल्मेटची किंमत वेगवेगळी आहे. या हेल्मेटवर कुठेही किंमत लिहिलेली दिसून येत नाही. तोंडी भाव सांगितला जात होता. महिलांसाठी असलेल्या हेल्मेटमध्ये बनावट हेल्मेटचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस पुलापासून ते निगडीपर्यंत रस्त्यावर हेल्मेट विक्री करणारे विक्रेते जे हेल्मेट 600 रुपयांना विकतात. दुकानांमध्ये त्याच हेल्मेटची किंमत 300 रुपये असल्याचे आढळले. दुकानांमध्ये नामांकित हेल्मेटवर आयएसआय प्रमाणित असल्याचा लोगो असतो. अगदी तसाच बाहेर विक्री होणार्‍या हेल्मेटवरही लोगो असतो, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.