Wed, Jul 17, 2019 20:03होमपेज › Pune › दिव्यांग, एड्सग्रस्तांच्या  संस्थांना मिळकतकर, पाणीपट्टी माफ

दिव्यांग, एड्सग्रस्तांच्या  संस्थांना मिळकतकर, पाणीपट्टी माफ

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 12:25AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरात अंध, अपंग, मूकबधिर, मतिमंद, कुष्ठपीडित अपंग अशा दिव्यांगांचा सांभाळ करणार्‍या स्वयंसेवी व सामाजिक संस्थांना मिळकतकर व पाणीपट्टी भरता न आल्याने त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अशा संस्थांकडून मिळकतकर व पाणीपट्टी न घेण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे.  अंध, अपंग, मूकबधिर, मतिमंद, कुष्ठपीडित अपंग अशा दिव्यांगांचा सांभाळ सामाजिक संस्था करतात.

दुर्बल घटकातील व्यक्तींचे जीवन सुकर व्हावे, त्यांच्या जगण्याच्या किमान गरजा भागविता याव्यात, या दृष्टीने त्या संस्था प्रयत्नशील असतात. त्या संस्था शासनानेच काम करीत आहेत. तथापि लोकवर्गणी, दानशूर व्यक्तींच्या साह्यावर अवलंबून असलेल्या अशा संस्थांना बर्‍याच वेळा मिळकतकर, पाणी बिल भरता न आल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याने अशा संस्था बंद करण्याची वेळ येते. पर्यायाने समाजातील अत्यंत दुर्बल असलेल्या घटकाला रस्त्यावर येण्याची वेळ येते. 

समाजामध्ये सामाजिक सलोखा राखण्याचे काम करणार्‍या नोंदणीकृत सामाजिक संस्था; तसेच अंध, अपंग, मूकबधिर, निराधार, मतिमंद, कुष्ठपीडित अपंग; तसेच एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ करणार्‍या नोंदणीकृत सामाजिक संस्थांना मिळकतकर व पाणीपट्टी बिल माफ  केल्यास जास्तीत जास्त संस्थांना सामाजिक कार्यात सहभाग घेण्यास प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे सदर सामाजिक संस्थांना मिळकतकर व पाणीपट्टी बिल  माफ करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.  या उपसूचनेला उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शहरातील या प्रकारच्या सामाजिक संस्थांना मिळकतकर व पाणीपट्टी माफीचा लाभ मिळणार आहे.