Sun, Jan 19, 2020 22:33होमपेज › Pune › महापालिकेकडून दहा महिन्यांत ५९० अवैध बांधकामांवर हातोडा

महापालिकेकडून दहा महिन्यांत ५९० अवैध बांधकामांवर हातोडा

Published On: Dec 03 2017 2:38AM | Last Updated: Dec 03 2017 2:06AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात दहा महिन्यांत एकूण 590 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण 3 हजार 915 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, एकूण 231 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाई केल्यानंतर ती अनधिकृत बांधकामे पुन्हा ‘जैसे थे’ उभारण्यात आल्याची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे कारवाईचा निव्वल ‘फार्स’ असल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागामार्फत शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे.

जानेवारी 2017 मध्ये 16, मार्चमध्ये 101, एप्रिलमध्ये 73, मे महिन्यात 118, जून 59, जुलै 75, ऑगस्ट 52, सप्टेंबर 59 आणि ऑक्टोबर महिन्यांत 37 अशी 590 अनधिकृत बांधकामांवर दहा महिन्यांच्या कालावधीत कारवाई करण्यात आली.  महापालिकेची निवडणूक फेबु्रवारी महिन्यात झाली. या काळात उमेदवार आणि नेतेमंडळींच्या आशीर्वादाने अनेकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे,  वाढीव बांधकामे केली आहेत. आताही शहराच्या अनेक भागात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत.

या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा राज्यभर गाजला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने राज्यातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबतची अधिसूचना 7 ऑक्टोबर 2017 ला जारी केली. त्यामुळे शहरातील  त्या काळातील अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत. परंतु, त्या नियमावलीत अनेक जाचक अटी आहेत.

अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी जमिनीच्या चालू बाजारभावाचा (रेडिरेकनर) आधार घेतला जाणार आहे. भूखंड रक्कम निश्‍चित झाल्यावर त्याच्या चार टक्के विकास शुल्क,  तर प्रशमन शुल्क आणि मूलभूत सुविधा शुल्क म्हणून 16 टक्के दर आकारला जाणार आहे. या 20 टक्क्यांखेरीज गच्ची, वाहनतळ, जिना, मजले नियमित करण्यासाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बांधकाम नियमित करण्यासाठी महिनाभरात पालिकेकडे केवळ एकच अर्ज आला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाची प्रक्रिया  संथगतीने सुरू आहे.