Thu, Mar 21, 2019 11:19होमपेज › Pune ›  प्रलंबित प्रश्‍नांवर पालकमंत्री करणार मध्यस्थी

 प्रलंबित प्रश्‍नांवर  पालकमंत्री करणार मध्यस्थी

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:52AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

महापालिकेचे राज्य शासनाशी संबंधित आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी योजना, 24 बाय 7 पाणीपुरवठा,  शासनाकडून ताब्यात घ्यावयाचा जागा, पहिल्या टप्प्यातच मेट्रोचे काम निगडीपर्यंत करणे आदी प्रलंबित व महत्वाचे प्रकल्प व प्रश्‍नांसंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट मध्यस्थी करणार आहेत. संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत नागपूर अधिवेशात येत्या दोन ते तीन दिवसात बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आंद्रा-भामा आरखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. या योजनेसाठी जलवाहिनीसाठी जागा आवश्यक आहे. पुनावळे येथील कचरा डेपोसाठी वन विभागाकडून जागा ताब्यात येणे प्रलंबित आहे. तसेच, तळवडे येथील एसटीपी प्लँटसाठी आरक्षित जागा पशुसंवर्धन विभागाकडून ताब्यात आलेली नाही. त्याचबरोबर संरक्षण खात्याशी संबंधित रेड झोन, बोपखेल, उड्डाणपूल आणि  साई चौक रस्त्यासाठी पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मची जागा ताब्यात घेणे, पिंपळे सौदागर रस्त्यासाठी जागा महापालिकेच्या ताब्यात मिळालेली नाही.

त्यामुळे पालिकेस विकासकामे करण्यास मर्यादा पडून विलंब होत आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रोचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पांना आवश्यक जागा आणि परवानगी मिळवून देण्यासाठी संबंधित खात्यांचे मंत्री व अधिकार्‍यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात बैठक घेण्यात येईल. त्यासाठी पालकमंत्री बापट यांनी मध्यस्थी करणार आहेत. संबंधित विषयावर त्वरीत तोडगा काढून या कामांना गती देण्यात येणार आहे.

या बैठकीस शहरातील तिन्ही आमदार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार उपस्थित राहणार आहे. शासनाच्या परवानगीविना प्रलंबित असलेल्या पालिकेच्या कामांचा आढावा पालकमंत्री यांनी 27 नोव्हेंबर पालिकेत झालेल्या एका बैठकीत घेतला होता. त्यानुसार सदर बैठक नागपूर अधिवेशानात आयोजित केली जाईल. संबंधित मंत्री व आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लावली जातील. ही बैठक दोन ते तीन दिवसात निश्‍चित होईल, असे सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी सांगितले.