Sat, Jun 06, 2020 09:11होमपेज › Pune › पिंपरीत शासन आपल्या दारी

पिंपरीत शासन आपल्या दारी

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:57AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

अपंग, विधवा, घटस्फोटित महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध योजनांची प्रकरणे एकाच ठिकाणी तत्काळ मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी (दि. 5) पिंपरी येथे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या विविध सवलतींसाठी नागरिकांना होणारा त्रास व शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारावे लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कामे एकाच ठिकाणी तत्काळ होण्यासाठी या शिबिराचे आयोजन आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या पिंपरी येथील कार्यालयात करण्यात आले आहे.

तलाठी, तहसीलदार, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अधिकारी, रेशनिंग विभागाचे अधिकारी सर्व एकत्रितरीत्या येऊन नागरिकांची प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यासाठी दिवसभर या शिबिरात सहभागी होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद, क्षयरोग, पक्षघात, विधवा महिला, कर्करोग, कुष्ठरोग, एड्स, घटस्फोटित महिला, अत्याचारित महिला, परित्यक्ता महिला, अनाथ मुले-मुली यांना संजय गांधी निराधार योजनेमार्फत पेन्शन योजना व 65 वर्षांवरील नागरिक ज्यांना मुलगा नाही अशा नागरिकांना श्रावणबाळ योजनेमार्फत व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांनी केले आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयात येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे. या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन नागरिकांना विविध योजनांची माहिती देखील मिळवता येणार आहे. महिलांना त्यांच्या योजनांबद्दल अगदी त्यांच्या घराजवळच मिळणार असल्याने नागरिकांना या उपक्रमाचा फायदा ठरू शकतो अशी माहिती आयोजकांनी सांगितले.