Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Pune › आता ‘गिफ्ट’ही ‘कॅशलेस’

आता ‘गिफ्ट’ही ‘कॅशलेस’

Published On: Dec 14 2017 2:16AM | Last Updated: Dec 14 2017 2:15AM

बुकमार्क करा

 

पिंपरी ः नरेंद्र साठे

‘कॅशलेस’ व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. विविध क्षेत्रांत ‘कॅशलेस’ व्यवहार सुरू असताना, आता थेट लग्नात देखील ‘कॅशलेस गिफ्ट’  प्रकार आता रुजत आहे. वर किंवा वधू पक्षाला भेटवस्तू किंवा रोख रकमेत आहेर करण्याची पद्धत आहे. आता यामध्ये काही प्रमाणात का होईना बदल होत आहे. सध्या लग्नामध्ये मित्रमंडळींकडून नवरा-नवरीला काही ठराविक रकमेचे ‘गिफ्ट कार्ड’ दिले जात आहे. सध्या हा ‘ट्रेंड’ पुण्यासारख्या शहरांबरोबरच खानदेशातील लग्नांमध्ये दिसून येत आहे.

लग्नसमारंभासांठी गेल्या वर्षी नोटबंदीनंतर अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे लग्नासाठीची खरेदी अनेकांनी ‘कॅशलेस’ व्यवहार करून केली होती, तर या लग्नसराईमध्ये आता थेट ‘गिफ्ट’देखील ‘कॅशलेस’ झाल्याचे दिसून येत आहे. वधू-वरांना नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून आहेर हा रोख रकमेत केला जातो. त्याचबरोबर भेटवस्तू देखील दिली जाते. आता अनेक बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना विविध सेवा दिल्या जातात. यामध्ये ‘गिफ्ट कार्ड’ देखील अनेक बँका ग्राहकांना देतात. गेल्या दिवाळीमध्ये बहुतांश बँकांनी ही सुविधा देऊ केली होती. दिवाळीच्या काळात एकमेकांना ही ‘गिफ्ट कार्ड’ दिली गेली. आता हीच ‘गिफ्ट कार्ड’ लग्नसमारंभांत देखील पोचली आहेत. भेटवस्तू काही दिवसांनी खराब होतात, त्यांचा जास्त वापर होत नाही, या आणि अशा विविध कारणांमुळे नागरिक आता बँकांकडून मिळत असलेल्या ‘गिफ्ट कार्ड’चा वापर लग्नसमारंभांमध्ये देखील करत आहेत.

लग्नसमारंभ असलेल्या वधू-वर पक्षांना या कार्डमुळे फायदा होत आहे. या ‘गिफ्ट कार्ड’द्वारे त्यांना हवी असलेली खरेदी ते करू शकतात. शिवाय सध्या खरेदी करताना ‘गिफ्ट कार्ड’ सर्वत्र चालत असल्याने वापरण्यास देखील अडचण येत नाही. वापरण्यास सहज सोपे असल्याने लग्नसमारंभांमध्ये ‘गिफ्ट कार्ड’चा ‘ट्रेंड’ चांगलाच रुजताना दिसत आहे. त्यामुळे आता लग्नाला जाताना मोठमोठे  पॅकिंग घेऊन जातानाचे चित्र कमी होईल आणि खिशातील गिफ्ट येत आहे. एका बँक अधिकार्‍यांने सांगितले की, या लग्नसराईत ‘गिफ्ट कार्ड’ची मागणी आहे. मित्रांना ‘गिफ्ट’ म्हणून रक्कम देण्याऐवजी तुम्हाला हव्या तेवढ्या रकमेतील ‘गिफ्ट कार्ड’ देणे केव्हाही सोईस्कर ठरते. येत्या काही दिवसांमध्ये यामध्ये मागणी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर सध्या लग्नसराईत यासाठी ग्राहकांकडून विचारणा केली जात आहे.