Sat, May 30, 2020 11:51होमपेज › Pune › सांडपाणी प्रकल्पाबाबत पर्यावरण विभाग उदासीन

सांडपाणी प्रकल्पाबाबत पर्यावरण विभाग उदासीन

Published On: Dec 03 2017 2:38AM | Last Updated: Dec 03 2017 1:55AM

बुकमार्क करा

पिंपरी ः संजय शिंदे 

दीड वर्षापासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका पर्यावरण विभाग यांच्यात नदी प्रदूषणाबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. एकीकडे याबाबत सुनावणी होत असतानाही, पालिका पर्यावरण विभाग याबाबत गंभीर नसल्याचे समोर येत आहे. चर्‍होली येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पातून आजही  प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरण विभाग सांडपाणी प्रकल्पाबाबत  उदासीन असल्याचे समोर येत आहे. 

पालिका हद्दीत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे 13 प्रकल्प कार्यान्वित आहेत.  जवळपास दीड वर्षापूर्वी पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीमध्ये या प्रकल्पांतील प्रक्रिया न केलेले 71 दशलक्ष लिटर पाणी सोडण्यात येत असल्याचे कारण देत तत्कालीन पालिका आयुक्त, पयार्वरण विभागाचे कार्यकारी अभियंता आणि सह शहर अभियंत्यांविरोधात  न्यायालयात प्रदूषण मंडळाने धाव घेतली आहे. पाणी कायदा 1974, हवा कायदा 1981 आणि पर्यावरण कायदा 1986 नुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करून निर्माण झालेल्या पाण्याचा पुनर्वापर पालिका हद्दीतील उद्याने, बांधकामे, रस्त्यालगतची झाडे व इतर कामासाठी करण्याचा नियम आहे. त्यानुसार काही टक्के पाण्याचा वापर हा प्रदूषण मंडळाच्या नियमानुसार करण्यात येत असला, तरीही 220 दशलक्ष लिटर मधील 71 दशलक्ष लिटर सांडपाणी हे प्रक्रिया न करताच पवना, इंद्रायणी व मुळा नदीत सोडण्यात येत असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पालिकेला सादर केला आहे. त्याअनुषंगानेच प्रदूषण मंडळ आणि पालिका पर्यावरण विभागामध्ये न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे.

चर्‍होलीतील इंद्रायणी नदीकाठी पालिकेचा सांडपाण्यावर प्रक्रिया करणार 21 दशलक्ष लिटरचा प्रकल्प कार्यान्वित आहे. या प्रकल्पात गोळा करण्यात येणारे सांपडपाणी ओव्हर फ्लो होत असल्याने 20 दशलक्ष लिटरच्या दुसर्‍या प्रकल्पाचे काम सुरू आहे; परंतु ज्या जागेवर हा प्रकल्प सुरू आहे त्या जागेबाबत संबंधित शेतकरी आणि पालिकेमध्येही न्यायालयीन वाद सुरू आहे. संबंधित शेतकर्‍यांनी या प्रकल्पाला आकुर्डी न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. कार्यान्वित असणार्‍या प्रकल्पातून आजही मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सरळ नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रदूषण मंडळाने याबाबत न्यायालयात धाव घेत त्याअनुषंगाने सुनावणी  सुरू असतानाही जर नदीत प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडण्यात येत असेल, तर पालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्‍न उपस्थित होताना दिसत आहेत.