होमपेज › Pune › पिंपरी रोजगार कार्यालयाला  मिळेना पूर्णवेळ अधिकारी

पिंपरी रोजगार कार्यालयाला  मिळेना पूर्णवेळ अधिकारी

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:06AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

पिंपरीतील रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयातील मार्गदर्शन अधिकारी हे पद दोन वर्षांपासून रिक्‍त आहे. सध्या विजय कानिटकर यांच्याकडे अतिरिक्‍त कार्यभार आहे; मात्र ते पुण्यातील रास्ता पेठ येथील कार्यालयात असतात. त्यामुळे पिंपरीतील कार्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांना लिपिकांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचा कारभार कारभार्‍याविनाच सुरु असून शासनाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

पिंपरीतील रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे दर वर्षी सुमारे 14 हजार बेरोजगार युवक नोंदणी करत आहेत. पूर्वी नावनोंदणी करण्यासाठी उमेदवाराला प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित रहावे लागत. त्यामुळे मोठी गर्दी होत असे. आलेल्या युवकांना कार्यालयामार्फत तयार फॉर्ममध्ये माहिती भरून तो फॉर्म कार्यालयात जमा करावा लागे. त्यानंतर त्याची संगणकावर नोंद केली जात असे. कंपन्यांनाही आपल्या रिक्‍त जागा कळविण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असत. आता रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने कात टाकली असून, युवकांना नावनोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. 3 जानेवारी 2013 पासून ही ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे; मात्र युवकांना ऑनलाईन प्रक्रियेबाबतची माहिती मिळण्यात अडचण येत आहे. शासनाकडूनही या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 

पिंपरीतील कार्यालयात दिवसातून सुमारे पंधरा ते वीस विद्यार्थी या कार्यालयाला भेटत आहेत. कार्यालयात मार्गदर्शन अधिकार्‍यांचे पद दोन वर्षे रिक्‍त आहे. पुर्वी प्रदीप नवाळे हे कार्यरत होते. त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांनतर पाच महिने हे पद रिक्‍त आहे. त्यामुळे कार्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांना लिपिकाकडून मार्गदर्शन केले जात आहे. कार्यालयीन विविध कामांसाठी लिपिकांना बाहेर जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यात अडचण येत आहे. अनेक वेळा माहिती न मिळताच परतावे लागत आहे. सध्या या कार्यालयाचा अतिरिक्‍त पदभार विजय कानिटकर यांच्याकडे देण्यात आला आहे; मात्र ते पिंपरीतील कार्यालयात काम असेल तरच उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत इतर कर्मचार्‍यांवर कामाची जबाबदारी पडत आहे. त्यामुळे हे पद भरणार की नाही असा प्रश्‍न उपस्थित राहत आहे.