Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Pune › ‘वायसीएम’ कर्मचार्‍यांचे रुग्णालयासमोर आंदोलन

‘वायसीएम’ कर्मचार्‍यांचे रुग्णालयासमोर आंदोलन

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:20AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून विशेष कार्य अधिकार्‍याने महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) वैद्यकीय अधीक्षकाला धमकी दिली असल्याची घटना नुकतीच घडली. त्याच्या निषेधार्थ वायसीएममधील कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि. 11) सकाळी रुग्णालयासमोर आंदोलन केले. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय सातत्याने वादाच्या भोवर्‍यात अडकले आहे. रुग्णांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधांचा अभाव, डॉक्टर, अधिकार्‍यांचे रुग्णांशी व नातेवाइकांशी उद्धट वागणे आदींसह विविध समस्यांनी या रुग्णालयाला घेरले आहे. सध्या या रुग्णालयात सुरू असलेल्या अधिकार्‍यांच्या वादामुळे पुन्हा हे रुग्णालय चर्चेत आले आहे.

कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्माकर पंडित यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना शुक्रवारी (दि.8) धमकी दिली होती. ‘माझी पोच खूप वरपर्यंत आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईन, माझ्या नादाला लागाल, तर मी सगळ्यांची वाट लावीन,’ अशी धमकी दिली होती. याबाबत डॉ. देशमुख यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे; तसेच डॉ. पंडित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे. दोन दिवस पालिकेला सुटी होती, त्यामुळे धमकी प्रकरण शांत होते. सोमवारी कामकाज सुरू होताच वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्‍यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर काही काळ आंदोलन केले. रुग्णालयातील अधिकार्‍यांचा वाद वाढतच चालला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यामध्ये अद्याप आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लक्ष घातले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा वाद थांबणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.