Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Pune › ‘एम्पायर इस्टेट’ पुलावर  रॅम्पसाठी 13 कोटी खर्च

‘एम्पायर इस्टेट’ पुलावर  रॅम्पसाठी 13 कोटी खर्च

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:26AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

वाहतूक सुरळीत होण्यासाठी उड्डाणपुलावर जाण्यास व उतरण्यास असे दोन रॅम्प चिंचवड येथील एम्पायर इस्टेट येथे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 12 कोटी 69 लाख 41 हजार 281 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यास बुधवारी (दि. 17) होणार्‍या स्थायी समिती सभेत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. एम्पायर इस्टेट हाउसिंग सोसायटीने उड्डाणपुलाला जोडणारे हे रॅम्प बांधण्यास पूर्वीपासून विरोध केला आहे. यामुळे सोसायटीच्या आवारात वाहतूक कोंडी होणार असल्याने सोसायटीच्या पदाधिकारी व सदनिकाधारकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे; मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलावर रॅम्पची गरज असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सदर रॅम्प कोणत्याही परिस्थितीत उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. 

त्या दृष्टीने महापालिका प्रशासन पावले टाकत आहे. उड्डाणपुलावर जाण्यासाठी व उतरण्यासाठी असे दोन रॅम्प एम्पायर इस्टेट येथे बांधले जाणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया महापालिकेने पूर्ण केली आहे. हे काम टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीस देण्यात येणार आहे. कंपनीची 11 कोटी 15 लाख 71 हजार आणि  43 लाख 79 हजार रुपयांची युटिलिटी रॉयल्टी अशी 9.85 टक्के अधिक दराने निविदा प्राप्त झाली आहे. सन 2017-18च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्वीकृत दरापेक्षा 2.56 टक्के जास्त आहे. सदर काम 12 कोटी 69 लाख 41 हजार रुपये खर्चात टी अ‍ॅण्ड टी कंपनीकडून करून घेण्यात येत आहे.  भाववाढी कलमानुसार मटेरिअलच्या वाढ किंवा घट दरानुसार फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे. सदर खर्चास मान्यता देण्याचा विषय बुधवारी होणार्‍या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे. आयुक्तांचे मत पाहता या विषयाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.