Fri, Nov 16, 2018 21:21होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड, पुण्यात ‘पद्मावती’ प्रदर्शित करू नका

पिंपरी-चिंचवड, पुण्यात ‘पद्मावती’ प्रदर्शित करू नका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पद्मावती चित्रपटात राणी पद्मावतीबद्दल झालेले चित्रीकरण पूर्णपणे चुकीचे आहे. सिनेमाच्या माध्यमातून विकृत स्वरूप दाखविले जात आहे. पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल; त्यामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात  पद्मावती चित्रपट प्रदर्शित करू नका, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे पोलिस आयुक्त, दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांना दिल्या आहेत. 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात पद्मावती राणीचा अपमान केला असल्याचा आरोप करत, या चित्रपटाच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील राजपूत समाज संघटनेने सोमवारी (दि. 27) पिंपरी-चिंचवड महापालिका भवनावर मोर्चा काढला. पालकमंत्री बापट यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

बापट म्हणाले की, पद्मावती चित्रपट लोकांसमवेत एकदा पाहा. सेन्सॉर बोर्डाने जे मान्य केले असले, तरी जे नागरिकांना मान्य नाही, ते प्रसंग चित्रपटातून काढून टाका. नागरिकांनी मान्यता दिल्यानंतरच तो चित्रपट दाखवा, असे पत्र मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे; तसेच सेन्सॉर बोर्ड वेगळे आहे; त्यामुळे सेन्सॉर बोर्डावर काही करता येत नाही. न्यायालयाने दुर्दैवाने त्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असे ठरविले आहे. त्यामुळे यामध्ये सरकार हस्तक्षेप करेल. पद्मावतीसंदर्भात जे विकृत प्रदर्शन केले आहे, ते काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही बापट यांनी सांगितले; तसेच आंदोलकांसोबत मुंबईत बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.