Sun, May 26, 2019 13:19होमपेज › Pune › भाजपमध्ये उसळला निष्ठावंत-उपरा वाद

भाजपमध्ये उसळला निष्ठावंत-उपरा वाद

Published On: Jan 30 2018 2:19AM | Last Updated: Jan 29 2018 11:51PMमिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही निष्ठावंत आणि उपरा असा वाद नेहमीच खदखदत आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या 415 कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांच्या निविदेमुळे पुन्हा हा वाद उसळला आहे. या प्रकरणाची भाजपाच्या खासदारांनीच थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने पक्षांतर्गत वाद विकोपाला पोचले आहेत. परिणामी, ‘पारदर्शक आणि शिस्तबद्ध’ असे बिरुद मिरविणार्‍या भाजपची प्रतिमा मलीन होत आहे.  

म हापालिकेच्या फेबु्रवारी 2017 च्या निवडणुकीत तिकीट वाटपावरूनच निष्ठावंत आणि उपरा असा वाद निर्माण झाला होता. निष्ठावंतांना तिकिटे नाकारून उपर्‍यांना दिल्याने स्थानिक नेत्यांचे पुतळे जाळण्यापर्यंतचा प्रकार घडला होता. नंतर हा वाद निवळला. महापौर; तसेच स्वीकृत सदस्यांच्या निवडीमध्येही असा वाद रंगला होता. राज्य व स्थानिक नेतेमंडळींना मध्यस्थी करीत दोन्ही बाजूंच्या गटांना सबुरीचा सल्ला दिला. मात्र, दोन्ही गटांत खदखद कायम आहे. 

स्थायी समितीने समाविष्ट गावांतील विविध रस्ते विकासकामांसाठी 13 डिसेंबर 2017 मध्ये एकाच वेळी 425 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी दिली. या निविदा ठराविक 12 ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून काढल्या असून, त्यात ‘रिंग’ होऊन सुमारे 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने केला. आरोप करतानाही त्यांनी मागील दोन वर्षांतील संबंधित कामे व त्याच ठेकेदारांच्या निविदा दराची कागदपत्रे पत्रकारांसमोर सादर केली आहेत. पूर्वी कमी दराने निविदा भरणारे हे ठेकेदार आता चढ्या दराने निविदा भरूनही त्या मंजूर केल्या गेल्या आहेत. मुळात ‘एस्टिमेट’ अधिक रकमेचे काढण्यात आले होते. जागा ताब्यात नसतानाही निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. एकाच दिवशी या सर्व फायलींवर आयुक्तांनी सह्या केल्या आहेत. यामध्ये आयुक्तांसह मुख्य लेखापाल व मुख्य लेखापरीक्षकही सामील असल्याची शंका उपस्थित झाली आहे.

या मुद्द्यावरून विरोधक भाजपला वारंवार आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत आहेत.  या संदर्भात बातम्या आणि चर्चेमुळे पक्षाची बदनामी होत असल्याने भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली. आपल्या मुलीला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून उभे करायचे असल्याने ते हा प्रकार जाणीवपूर्वक करीत असून, अगोदर पदाचा राजीनामा द्या, मग पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या कामांच्या चौकशीच्या मागणीचे आव्हान त्यांनी दिले. या प्रतिहल्ल्याने घायाळ झालेल्या खासदार साबळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

खासदार साबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न खाऊगाँ, न खाने दूंगा’ या घोषणेची आठवण करून देत महापालिकेच्या कारभारात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराच दिला. या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. मात्र, निष्ठावंत आणि उपरा हा पक्षातील वाद न संपणारा आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाचा सावळे यांचा कार्यकाळ महिनाभरात संपत असल्याने त्यांचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही. दरम्यान, ‘डीएसआर’ऐवजी स्थानिक बाजारभाव लक्षात घेऊन नव्या ‘एसएसआर’ नुसार सदर निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, त्यात 30 कोटींची बचत झाल्याचा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.

तसेच, महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी खुलासा केला. 32 कोटी 34 लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा करीत निविदा प्रक्रियेचे समर्थन केले आहे. दुसरीकडे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनीही सीमा सावळे यांची पाठराखण केली आहे. मात्र, या 425 कोटींच्या निविदा प्रकरणामुळे विरोधकांना भाजपविरोधात आयते कोलीत मिळाले आहे. येेनकेन प्रकारेन या विषयावर विरोधक भाजपला घेरत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे, भाजपात निष्ठावंत आणि उपरा असा वाद नव्याने उफाळला आहे.