Wed, Apr 24, 2019 00:11होमपेज › Pune › पायाभूत सुविधांपासून अपंग अद्यापही वंचितच

पायाभूत सुविधांपासून अपंग अद्यापही वंचितच

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:33AM

बुकमार्क करा

पिंपरी :पूनम पाटील

अपंगत्व हे संयुक्त राष्ट्रांच्या योजनांमधील महत्त्वाचे उद्दिष्ट असून, 1992 पासून 3 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे अपंग दिन म्हणून साजरा केला जातो.  शारीरिक किंवा मानसिक त्रुटींमुळे अपंगत्व आलेल्या समाजातील घटकांच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी अपंग व्यक्तींच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असून, पायाभूत सुविधांअभावी खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी अपंगांना मुक्तपणे वावरता येत नाही. त्यामुळे उपयुक्त सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शहरातील अपंगांतून होत आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील पाच वर्षांवरील 40 टक्के अपंगत्व असलेल्या सर्वांना दरमहा दोन हजार रुपये पंडित दीनदयाल उपाध्याय पेन्शन देण्यात येणार आहे. ही योजना अपंगांना अपंग दिनाची अनोखी भेट असल्याच्या भावना अपंगांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र, केवळ मंजुरी देऊ नका, तर ते लाभ शंभर टक्के अपंगांपर्यंत पोचवा, अशी अपेक्षा शहरातील अपंग व्यक्त करत आहेत. प्रशासनाने उभारलेल्या शहरातील सरकारी आणि निमसरकारी इमारतीत, चित्रपटगृहे, रेल्वे स्थानके, हॉटेल अशा सार्वजनिक ठिकाणी अपंगांसाठी विशेष व्यवस्था असणे बंधनकारक आहे. मात्र, आजही अनेक ठिकाणी या नियमांचे पालन केले जात नाही. अपंगांसाठी 2016 चा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा आराखडा अजून मंंजूर झालेला नाही. त्यात अपंगांसाठी अनेक फायदेशीर तरतुदी आहेत; परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही.