Fri, Apr 26, 2019 03:47होमपेज › Pune › एक ‘बिटकॉईन’ साडेदहा लाखांच्या घरात

एक ‘बिटकॉईन’ साडेदहा लाखांच्या घरात

Published On: Dec 10 2017 1:37AM | Last Updated: Dec 10 2017 1:36AM

बुकमार्क करा

अमोल येलमार 

पिंपरी : ‘डिजीटल, क्रिप्सो करन्सी’ म्हणून संपूर्ण जगासह भारतात धुमाकूळ घालत असलेल्या  ‘बिटकॉईन’ने शनिवारी प्रत्येकी 16 हजार अमेरिकी डॉलरचे (सुमारे 10 लाख 20 हजार रुपये) मूल्य गाठले. या कॉईनमध्ये अवघ्या सात महिन्यांत तब्बल नऊशे पटीने वाढ झाली आहे. आर्थिक जगात इतक्या झपाट्याने फुगवटा वाढत आहे; मात्र हा फुगवटा कधीही फुटू शकतोे, असे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

कोणत्याही देवघेवीचे व्यवहार अथवा विनिमयाचे माध्यम म्हणून भारतात ‘बिटकॉईन’चा वापर अवैध असल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे, तरी देखील दिवसेंदिवस ‘बिटकॉईन’ची ‘क्रेझ’ वाढत असून, भारतामध्येही अनेकांनी मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये गुंतवणूक  केली आहे.  एप्रिल-मे महिन्यात जगातील अनेक देशांना ‘रॅन्समवेअर’ या सायबर हल्ल्याने ग्रासले होते. भारतामध्येही हा सायबर हल्ला झाला. त्या वेळी मागण्यात आलेली खंडणी ही ‘बिटकॉईन’च्या द्वारे करण्यात आली होती. त्यामुळे अंधरात सुरू असलेल्या ‘बिटकॉईन’चा काळा धंदा उजेडात आला. याबाबत चर्चा झाल्याने शासनाने त्याकडे  लक्ष वेधले. 

‘बिटकॉईन’च्या माध्यमातून केलेले व्यवहार हे पूर्णपणे गैर असल्याचे स्पष्ट केले; तसेच ‘बिटकॉईन’ आणि त्यासाठी पैसे ट्रान्स्फर करून देणार्‍या कंपन्यांची चौकशी करून  माहिती मागवली. मे महिन्यात ‘बिटकॉईन’ची किंमत एक ते सव्वा लाख रुपये एवढी होती. गेल्या सात महिन्यांत ही किंमत दहा लाख 20 रुपये इतकी झाली आहे. अवघ्या सात महिन्यांत 900 पट वाढ मिळणारे हे एकमेव क्षेत्र असावे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. आठ वर्षांपूर्वी तातोसी नाकामोटो नावाच्या व्यक्तीने तयार केलेल्या ‘बिटकॉईन’वर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही. अनेकांनी एकत्र येऊन चालवण्यात येत असलेला हा एक प्रकार आहे. 

भारतातून या चलनातील गुंतवणुकीची व्याप्ती आणि प्रमाण नेमके किती याचा कोणताही तपशील उपलब्ध नाही; तसेच तो रिझर्व्ह बँकेनेही दिलेला नाही. ‘बिटकॉईन’चे व्यवहार करणार्‍या कोणत्याही संस्था अथवा कंपन्या नोंदणीकृत नसल्याने तो तपशील मिळणे अवघड आहे. गुंतवणूकदारांनी  स्व-जोखमीवर ‘बिटकॉईन’सारखे व्यवहार करावेत, असेही मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे. कोणत्याही मध्यवर्ती नियंत्रक संस्थेविना, नियमाअभावी व्यक्तींच्या विश्‍वासावर हे व्यवहार होत आहेत. या चलनाच्या मूल्याची पुष्टी करतील, अशी कोणतीही मालमत्ता नाही. त्यामुळे त्यांचे मूल्यवर्धन हे केवळ सट्ट्यातूनच होत असते. सगळे व्यवहार नियंत्रणरहित, कोणतीही माहिती नसताना होत असल्याने, काळ्या पैशाला प्रतिबंध करणार्‍या देशातील कायद्यांचा भंग केल्याचा दोषारोप नाहक वापरकर्त्यांवरही येईल, असे मत आहे.