Thu, Mar 21, 2019 15:38होमपेज › Pune › दापोडी-बोपोडी पूल  3 महिन्यांत वाहतुकीस खुला

दापोडी-बोपोडी पूल  3 महिन्यांत वाहतुकीस खुला

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:11AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेच्या वतीने दापोडीतील हॅरिस पूल येथे समांतर दोन पुलांचे काम सुरू आहे. त्यातील दापोडीकडून बोपोडीस जाणार्‍या सीएमईच्या बाजूचा पूल येत्या तीन महिन्यांत पूर्ण होऊन वाहतुकीस खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, तर बोपोडीहून दापोडीकडे येणार्‍या पुलाचे काम पुणे महापालिकेने झोपडपट्टी न हटविल्याने अद्याप अधांतरीच आहे. त्यामुळे त्या कामास वर्षभराचा विलंब होण्याची शक्यता आहे.  

हॅरिस पूल हा ब्रिटिशकालीन आहे. त्याच्या शेजारी एक पूल 1987 मध्ये बांधण्यात आला. या दोन पुलांना समांतर दोन पूल 22 कोटी 50 लाख रुपये खर्चून दोन्ही महापालिकांच्या वतीने बांधण्यात येत आहेत. या कामास 14 मे 2016 ला सुरुवात झाली. सीएमईसमोरील भुयारीमार्गासंदर्भात लष्कराने आक्षेप घेतल्याने, पावसाळा; तसेच मुळा नदीपात्रात पाणी वाढल्याने काम बंद ठेवण्यात आले होते.

सीएमईच्या बाजूने दापोडीहून बोपोडीकडे जाणार्‍या पुलाचे काम वेगात सुरू असून, दोन्ही बाजूने पूल डांबरी रस्त्याने जोडण्याचे कामही सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूल पूर्ण करण्याचे पिंपरी महापालिकेचे नियोजन आहे. त्यानंतर तत्काळ तो वाहतुकीस खुला केला जाणार आहे. मात्र, बोपोडीहून दापोडीच्या दिशेने येणार्‍या पुलाच्या कामास बोपोडीतील झोपडपट्टीचा अडथळा कायम आहे.

पुणे महापालिकेतर्फे झोपडपट्टी हटविण्याची कारवाई 2 फेबु्रवारीला करण्यात येणार होती. त्यानंतर त्यासाठी आणखी 8 दिवसांचा कालावधी घेण्यात येऊनही कारवाई झालेली नाही. नदीपात्रात चार पिलर उभे करूनही त्यांच्या जोडणीस अडथळा आहे. परिणामी, पुलाचे काम केवळ 25 टक्के इतकेच झाले आहे. पुणे महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे या पुलाचे काम अधांतरी असल्याने पुलास आणखी किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.