Fri, May 24, 2019 16:30होमपेज › Pune › प्रकरण न्यायप्रविष्ट तरीही निविदा प्रक्रिया कायम

प्रकरण न्यायप्रविष्ट तरीही निविदा प्रक्रिया कायम

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:20AM

बुकमार्क करा

 पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील दैनंदिन रस्ते सफाई कामाच्या ठेका देण्यात आला आहे. या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू ठेवली आहे. यामुळे महापालिकेकडून न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनने केला आहे.  
राज्य शासनाच्या नियमानुसार निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 20 सप्टेंबर 2019 ला दिले होते. निविदा प्रक्रिया राबविताना ती न्यायालयासमोर सादर करावी, असेही न्यायालयाने निर्देश दिले होते; मात्र संबंधित संस्थांची उत्पन्नाची अट आणि शर्ती शिथिल केल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने 17 नोव्हेंबर 2017 ला न्यायालयात सादर केले. मात्र, तशी कोणतीही कारवाई न करता

महापालिकेने न्यायालयाची दिशाभूल केली, असा फेडरेशनने आरोप  केला आहे. अहल्यादेवी व अर्जुन आधार या स्वयंसेवी संस्थांचा निविदा प्रक्रियेत समावेश केला आहे, असे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले. त्या आधारावर न्यायालयाने सदर प्रकरणास स्थगिती दिली; मात्र  या दोन्ही संस्था फेडरेशनच्या सदस्य नाहीत. त्यामुळे महापालिकेने न्यायालयाची फसवणूक केली असल्याचा फेडरेशनने आरोप केला आहे. यासंदर्भात फेडरेशनने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून, ती न्यायालयाने स्वीकारली आहे. या सुनावणीच्या कालावधीत महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.