Fri, Apr 26, 2019 02:13होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सायकल ट्रॅक’ची बिकट वाट

पिंपरी-चिंचवडमध्ये सायकल ट्रॅक ची बिकट वाट

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:05AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

पुण्यामध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पांतर्गत सायकल भाड्याने देण्याच्या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असताना, पिंपरी-चिंचवडमधील सायकल ट्रॅक मात्र हद्दपार होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेला सायकल ट्रॅक कोणत्या ना कोणत्या कारणाने गायब होत आहे. सायकल ट्रॅकवर अतिक्रमण, मनपाने रस्त्यासाठी ट्रॅकच उखडून टाकल्याचे प्रकार शहरभर झाले आहेत, तर पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्याच्या धर्तीवर सायकलचा उपक्रम राबवण्यात आला, तर सायकल चालवायची कुठून, असा प्रश्‍न नागरिकांना पडणे साहजिक आहे.

शहरातील सायकल ट्रॅकची लागली वाट लागली असून, याकडे प्रशासनाचे लक्ष जाणार की नाही, असा प्रश्‍न सायकलप्रेमी व्यक्त करत आहेत. घरकुल चौक, कुदळवाडी चौक, शाहूनगर परिसरात असलेल्या सायकल ट्रॅक गायब झाले आहेत. फक्त नावाला सायकल टॅ्रकचे फलक लावले आहेत. त्या ठिकाणाहून सायकल चालवायची तरी कशी, असा प्रश्‍न सायकलस्वारांना पडला आहे. काही ठिकाणी विविध कामांसाठी सायकल ट्रॅकचे खोदकाम केले आहे, तर काही ठिकाणी पादचारी मार्गावरच सायकल ट्रॅकचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे नेमका हा सायकल ट्रॅक आहे, की पादचारी मार्ग याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. शहरात अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आला होता; परंतु सध्या येथे फक्त सायकल ट्रॅकचे फलक शिल्लक आहेत; परंतु ट्रॅक मात्र दिसत नाही, तर काही ठिकाणी ट्रॅकवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या सायकल ट्रॅक पुन्हा नव्याने निर्माण करण्याची मागणी सायकलप्रेमी करत आहेत.