Mon, Aug 19, 2019 09:14होमपेज › Pune › विसरा बाराखडी; आता आली चौदाखडी

विसरा बाराखडी; आता आली चौदाखडी

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:15AMपिंपरी : प्रतिनिधी

वाचनाची प्रथम पायरी म्हणून बालवाडी आणि प्राथमिक शाळांमधून मराठी भाषेतील मुळाक्षरे गिरवून घेतली जातात; मात्र गेल्या काही वर्षांत इंग्रजी शब्दाचा वाढता प्रभाव, संगणक कामकाज, ई-प्रणाली यामुळे ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ अशा दोन स्वरोच्चारांचा वापर वाढला आहे. याचा समावेश मुळाक्षरांमध्ये केला असून, मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षणामधून चौदाखडीबाबत सूचना दिल्या जात आहेत. परिणामी, आता शाळांमध्ये दोन नवीन स्वरांचा सराव करून घेतला जात आहे. 

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर झपाट्याने होत आहे; तसेच यापुढेही अधिकाधिक प्रमाणात होत राहणार आहे. शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संगणकाचा वापर सुरू केला असून, शासन व्यवहाराची भाषा मराठी असल्यामुळे संगणकावरही मराठी भाषेतून शासनाचे कामकाज पार पाडणे आवश्यक आहे. संगणकावर काम करण्यासाठी अनेक आज्ञावल्या (सॉफ्टवेअर) उपलब्ध आहेत; मात्र त्या सॉफ्टवेअरमध्ये एकरूपता नाही.

इंग्रजी फलकावर केलेली मराठी अक्षरजुळणी प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये वेगळी असते. एका सॉफ्टवेअरमधील फाईल दुसर्‍या सॉफ्टवेअरमध्ये उघडत नाही. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे ‘कि-बोर्ड’ आत्मसात करणे किंवा सॉफ्टवेअर विकत घेऊन संग्रही ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे संगणकाकडून वेगाने विविधांगी काम करणे मराठीच्या बाबतीत निष्फळ ठरत आहे.  यासाठी देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा संगणकावरील उपयोग वाढविण्यासाठी सर्व मराठी सॉफ्टवेअरर्सच्या ‘कि-बोर्ड’मध्ये एकरूपता आणणे  गरजेचे होते. त्यासाठी वर्णमालेचे व वर्णक्रमाचे प्रमाणीकरण करणे आवश्यक होते. 

अशी आहे चौदाखडी 

नूतन स्वरांचा समावेश असणारी चौदाखडी प्रशिक्षणाच्या वेळी शिक्षकांना देण्यात आली आहे. स्वरांमध्ये ‘ए’ नंतर ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ याचा नव्याने समावेश करण्यात आला. ‘अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, अ‍ॅ, ऐ, ओ, ऑ, औ, अं, अ:,’ असा चौदा स्वरांचा सुधारित क्रम आहे. 

पुढील शैक्षणिक वर्षात पुस्तकात होणार बदल

‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ अशा दोन स्वरांचा समावेश चौदाखडीमध्ये असून, यंदा जानेवारीपासून याची अंमलबजावणी केली आहे. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळांमध्ये चौदाखडी शिकविण्याच्या सूचनाही शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकामध्ये नवीन स्वरांचा समावेश करण्यात येणार आहे. शिक्षकांनीही चौदाखडी असणारे शैक्षणिक साहित्य वापरावे. 

प्राचार्य डॉ. कमला आवटे (डायट, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूणर्र् व्यावसायिक विकास संस्था, पुणे)