Mon, Jul 22, 2019 03:34होमपेज › Pune › संगणक जप्तीप्रकरणी विविध स्तरांतून निषेध 

संगणक जप्तीप्रकरणी विविध स्तरांतून निषेध 

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 1:26AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील शिवसेना गटनेते कार्यालयातून संगणक जप्त केल्याचा शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. भाजपाला सत्तेची मस्ती आली असून, त्यांना महापालिकेचे आयुक्त साथ देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेच्या तिसर्‍या मजल्यावर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचे दालनातील संगणकावरून माजी नगरसेवक मारुती भापकर हे सर्व वृत्तपत्रांना निवेदन तयार पाठवितात. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.15) सकाळी दालनातील संगणक जप्त केला. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत. 

शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी भाजपाला सत्तेची मस्ती चढली असल्याचा थेट आरोप केला आहे. महापालिका प्रशासनाने कोणत्या नियमात कारवाई केली, हे समजत नाही. एका शिवसैनिकाने पक्षाच्या कार्यालयात बसून संगणकावर पत्र टाईप केले, तर त्यात गैर काय आहे. यापूर्वी अनेक नगरसेवक प्रशासनाच्या कोणत्याही कार्यालयातील संगणकावर पत्र टाईप करून घेत होते. हा प्रकार सर्वांनाच माहीत आहे. असे असताना केवळ सत्ताधार्‍यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याने सूडबुद्धीने भाजपा पदाधिकार्‍यांनी प्रशासनावर दबाव टाकून हा प्रकार केला असल्याचा आरोप आल्हाट यांनी केला आहे. 

हे कृत्य म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रकार आहे. पादर्शकतेची भाषा करण्याचे भाजपाला शोभत नसून, त्याचा खरा चेहरा जनतेपुढे आला आहे. शहरातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने या कृत्यांचा निषेध करण्यात येत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते, सत्ताधारी भाजपा व महापालिकेच्या विरोधात निवेदन देतात. यामुळे त्यांना महापालिका भवनात प्रवेश नाकारणार का? असा खोचक सवाल उपस्थित करून सदर घटनेचा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी निषेध केला आहे. एकादा विषयाच्या विरोधात निवेदन काढल्याने शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयातून संगणक नेणे अयोग्य आहे. भाजपा पदाधिकार्‍यांच्या सांगण्यावरून महापालिका प्रशासनाने ही लोकशाही विरोधी कारवाई केली आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.